Join us

Harsha Engineers: शेअर मार्केट होरपळले, पण गुंतवणूकदार मालामाल झाले; ‘या’ IPO ने दिला ३६ टक्के परतावा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2022 8:45 PM

या कंपनीच्या आयपीओने पदार्पणातच गुंतवणूकदारांना जबरदस्त परतावा दिला असून, चांगला नफा मिळाल्याचे सांगितले जात आहे.

Share Market News: गेल्या अनेक दिवसांपासून शेअर मार्केटमध्ये सातत्याने मोठ्या प्रमाणात चढ-उतार होत असल्याचे पाहायला मिळत आहे. मात्र, एकीकडे शेअर बाजार कोसळलेला असताना, नव्या दाखल झालेल्या एका IPO ने गुंतवणूकदारांना मालामाल केले आहे. अवघ्या काही दिवसांतच गुंतवणूकदारांना ३६ टक्क्यांवर परतावा दिल्याचे सांगितले जात आहे. 

हर्षा इंजिनियर्स इंटरनॅशनलचा आयपीओ लिस्ट झाले आहेत. या कंपनीच्या शेअर्सची लिस्टिंग धमाकेदार झाली. गुंतवणूकदारांना त्यावर चांगला लिस्टिंग नफा मिळाला आहे. हा शेअर एनएसईवर ४५० रुपयांच्या किमतीवर सूचीबद्ध झाला. हर्षा इंजिनियर्सला ३३० रुपयांच्या इश्यू किमतीच्या तुलनेत ४५० रुपयांवर सूचीबद्ध केल्याने, गुंतवणूकदारांना प्रति शेअर १२० रुपयांचा लिस्टिंग फायदा झाला आहे. हर्षा इंजिनियर्सचे सुरुवातीचे सबस्क्रिप्शन चांगलं होते. त्यामुळे लिस्टिंग प्रीमियरची अपेक्षा होती.

शेअर्समध्ये सातत्याने खरेदी होताना दिसत आहे

हर्षा इंजिनियर्सच्या IPO चे शेअर्स बीएसईवर ४४४ रुपये प्रति शेअर या दराने सूचीबद्ध आहे. गुंतवणूकदारांना बीएसईवर प्रति शेअर प्रति शेअर ११४ रुपयांचा लिस्टिंग फायदा झाला आहे. सुरुवातीच्या व्यापारात, हर्षा इंजिनियर्सचा शेअर बीएसईवर ३९ टक्क्यांच्या वाढीसह ४५८ रुपये प्रति शेअरवर व्यवहार करत होता. तसेच त्याच्या शेअर्समध्ये सातत्याने खरेदी होताना दिसत आहे.

दरम्यान, या कंपनीचा आयपीओ १४ सप्टेंबर ते १६ सप्टेंबर २०२२ पर्यंत सबस्क्रिप्शनसाठी खुला होता. २१ सप्टेंबर रोजी आयपीओसाठी बोली लावणाऱ्यांना शेअर्सचे वाटप करण्यात आले आहे. हर्षा इंजिनियर्स इंटरनॅशनल लिमिटेड एव्हिएशन आणि एरोस्पेस, रेल्वे, ऑटोमोटिव्ह, अक्षय ऊर्जा, कृषी आणि इतर उद्योगांसाठी अभियांत्रिकी उत्पादनांच्या विस्तृत श्रेणीचे उत्पादन करते. याशिवाय ते बांधकाम खाण क्षेत्रातील अभियांत्रिकी उत्पादने देखील प्रदान करते.

 

टॅग्स :इनिशिअल पब्लिक ऑफरिंगशेअर बाजार