Join us

निफ्टीची ५ वर्षातील सर्वात वाईट कामगिरी! ऐतिहासिक उच्चांकावरुन २००० अंकांनी घसरला

By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2024 2:52 PM

nifty 50 worst performance : आजही शेअर बाजारात घसरण पाहायला मिळत आहे. NSE चा निफ्टी अर्ध्या टक्क्यांच्या घसरणीसह २४२०० च्या आसपास व्यवहार करत आहे.

nifty 50 worst performance : सप्टेंबर महिन्यात ऐतिहासिक उच्चांकी पातळीवर पोहचलेला शेअर बाजार सध्या वाईट स्थितीतून जात आहे. शेअर बाजारासाठी हा महिना अत्यंत निराशाजनक ठरला आहे. ऑक्टोबरमध्ये सेन्सेक्स आणि निफ्टीची कामगिरी अत्यंत खराब झाली. NSE चा मुख्य निर्देशांक निफ्टी ५० ची कामगिरी या महिन्यात ५ वर्षातील नीचांकी पातळीवर गेली. ऑक्टोबरमध्ये ५ वर्षांत पहिल्यांदाच निफ्टी ६ टक्क्यांहून अधिक घसरला. सप्टेंबरच्या अखेरीस निफ्टी ५० ने जोरदार झेप घेत २६,२७७ अंकांच्या सर्वकालीन उच्चांकावर पोहोचला होता.

तेव्हापासून हा निर्देशांक २००० हून अधिक अंकांनी घसरला आहे. विदेशी गुंतवणूकदारांची विक्री हे बाजार घसरण्यामागे मुख्य कारण आहे. कंपन्यांच्या कमकुवत तिमाही निकालांमुळे गुंतवणूकदारांच्या विश्वासाला धक्का बसला आहे. ऑक्टोबरमध्ये विदेशी गुंतवणूकदारांनी भारतीय बाजारातून सुमारे १ लाख कोटी रुपये काढून घेतले आहेत. मार्च २०२० मधील विक्रीपेक्षा हे जास्त आहे. कोविड-१९ महामारी सुरू झाल्यानंतर निफ्टी ५० मध्ये २३ टक्क्यांची घसरण झाली होती.

आज निफ्टीची स्थिती काय?आजही (31 ऑक्टोबर) निफ्टीमध्ये घसरण दिसून येत आहे. बातमी लिहीपर्यंत ५० पैकी ३७ शेअर्स लाल रंगात व्यवहार करत होते. त्याचवेळी १३ शेअर्समध्ये वाढ दिसून येत आहे. टेक महिंद्रा, एचसीएल टेक, श्रीराम फायनान्स, टीसीएस आणि विप्रो यांचा सर्वाधिक घसरण झालेल्या समभागांमध्ये समावेश आहे. तर हिरो मोटोकॉर्प आणि रेड्डी सारख्या शेअर्समध्ये चांगली वाढ दिसत आहे.

तज्ज्ञाचे मते, विदेशी गुंतवणूकदारांनी केलेल्या विक्रीचा परिणाम अजूनही बाजारावर दिसून येत आहे. कंपन्यांचे मूल्यांकन त्याच्या शिखरावरून खाली आले आहे. पण, तरीही दीर्घकालीन सरासरीपेक्षा जास्त आहे. अहवालानुसार, शेअर्स वाढण्यासाठी कंपन्यांचे तिमाही निकाल खूप मजबूत असणे आवश्यक आहे. निकाल समाधानकारक नसल्यास खासकरुन विदेशी गुंतवणूकदार पाठ फिरवतात. 

टॅग्स :निफ्टीशेअर बाजारशेअर बाजार