Join us

Share Market Crash: एलआयसी आयपीओचा अखेरचा दिवस अन् शेअर बाजार धडाम; 800 अंकांनी कोसळला

By ऑनलाइन लोकमत | Published: May 09, 2022 10:18 AM

आज बाजार सुरु होताच बीएसई आणि एनएसई १-१ टक्क्यांनी कोसळला. शुक्रवारीदेखील शेअर बाजार कोसळला होता.

कोरोना महामारीची नवी लाट, युक्रेन युद्ध आणि महागाई यामुळे जगभरातील शेअर बाजार कोसळू लागले आहेत. गुंतवणूकदारांनी विक्रीचा सपाटा लावल्याने बाजार गेल्या सत्रातही कोसळला होता. आज एलआयसी आयपीओमध्ये गुंतवणूक करण्याचा अखेरचा दिवस आहे. अशातच शेअर बाजार कोसळू लागल्याने धाकधुक वाढली आहे. 

आज बाजार सुरु होताच बीएसई आणि एनएसई १-१ टक्क्यांनी कोसळला. शुक्रवारीदेखील शेअर बाजार कोसळला होता. आज शेअर बाजार सुरु होण्याआधीच कोसळणार असल्याचे संकेत दिसत होते. बीएसई सेंसेक्स सुरु होण्याआधीच्या सेशनमध्ये ६५० अंकांनी कोसळलेला होता. सिंगापूर एक्स्चेंजवर निफ्टी २०० अंकांनी घसरला होता. सकाळी ९.२० वाजता सेंसेक्स ८०० हून अधिक अंकांनी कोसळून ५४ हजारांजवळ व्यवहार करत होता. निफ्टी 220 अंकांनी कोसळून 16,180 अंकांवर स्थिरावला होता. 

शुक्रवार देखील घसरण झाली होती. तेव्हा सेसेक्स 866.65 अंकांनी कोसळून 54,835.58 अंकांवर बंद झाला होता. तर निफ्टी 271.40 अंकांनी कोसळून 16,411.25 अंकांवर बंद झाला होता. गेला आठवडा शेअर बाजारासाठी वाईट गेला. गुरुवारीदेखील शेअर बाजारात मोठा चढउतार पहायला मिळाला होता. 

 

जगभरातील बाजारांवर विक्रीचा दबाव आहे. शुक्रवारी अमेरिकेचे बाजारही तोट्यात होते. डाऊ जोन्स सरासरी 0.3 टक्क्यांनी घसरला होता. दुसरीकडे, Nasdaq 1.4 टक्के आणि S&P500 23.53 अंकांनी घसरला होता. जपानचा टॉपिक्स निर्देशांक 1.4 टक्क्यांनी खाली आहे. चीनचा शांघाय कंपोझिट 0.2 टक्क्यांनी किरकोळ वाढला आहे. 

टॅग्स :शेअर बाजार