Stock Market Open today: शेअर बाजारातील कामकाज गुरुवारी घसरणीसह सुरू झालं. बीएसई सेन्सेक्स 61 अंकांच्या घसरणीसह 72,285 अंकांच्या पातळीवर तर निफ्टी 23 अंकांनी घसरून 21927 अंकांच्या पातळीवर उघडला. पण त्यानंतर शेअर बाजारात 61 अंकांची वाढ होऊन तो 72,381 वर गेला, परंतु नंतर निफ्टीमध्येही किरकोळ वाढ दिसून आली. प्री-ओपन ट्रेडमध्ये, BSE सेन्सेक्स 80 अंकांनी घसरला होता तर निफ्टी 21930 च्या पातळीवर व्यवहार करत होता. बुधवारी शेअर बाजारात बरीच घसरण नोंदवण्यात आली. निफ्टी मिड कॅप आणि स्मॉल कॅप निर्देशांकात दोन टक्क्यांपर्यंत घसरण नोंदवली गेली.
भांडवली बाजार नियामक सेबीनं गुंतवणूकदारांच्या हिताचं रक्षण करण्यासाठी मार्गदर्शक तत्वं जारी केली होती, त्यानंतर स्मॉल कॅप आणि मीट कॅप निर्देशांकात कमजोरी नोंदवली गेली होती. गुरुवारी गिफ्ट निफ्टी मजबूतीसह कार्यरत होता.
गुरुवारी कामकाजाच्या सुरुवातीला निफ्टी मिड कॅप 100, बीएसई स्मॉल कॅप, निफ्टी आयटी आणि निफ्टी बँक निर्देशांकांमध्ये घसरण नोंदवली जात होती. गुरुवारी शेअर बाजाराच्या सुरुवातीच्या कामकाजात पुन्हा एकदा सर्व निर्देशांक घसरणीसह कामकाज होते. शेअर बाजाराच्या सुरुवातीच्या व्यवहारात रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड, कोल इंडिया लिमिटेड, अदानी पोर्ट्स, इंडसइंड बँक, एसबीआय, लार्सन अँड टुब्रो आणि अदानी एंटरप्रायझेसचे शेअर्स वधारले. तर बजाज ऑटो, टाटा कंझ्युमर, अपोलो हॉस्पिटल्स, सिप्ला, टीसीएस, एचसीएल टेक आणि इन्फोसिसचे शेअर्स घसरणीसह ट्रेड करत होते.
अदानी समूहाच्या शेअर्सची स्थिती काय?
गुरुवारी शेअर बाजाराच्या सुरुवातीच्या कामकाजात गौतम अदानी समूहाच्या 10 पैकी पाच लिस्डेट कंपन्यांचे शेअर्स रेड झोनमध्ये तर पाच शेअर्स ग्रीन झोनमध्ये ट्रेड करत होते. अदानी पोर्ट्सच्या शेअर्समध्ये किंचित वाढ झाली होती तर अदानी विल्मरचे शेअर्स 1.31 टक्क्यांच्या घसरणीसह व्यवहार करत होते.
गुरुवारी सुरुवातीच्या व्यवहारात जिओ फायनान्शियल, पटेल इंजिनीअरिंग, ब्रँड कॉन्सेप्ट, युनि पार्ट्स इंडिया, महिंद्रा, एक्साइड, इंजिनियर्स इंडिया, एनएमडीसी लिमिटेड आणि लार्सन अँड टुब्रोच्या शेअर्समध्ये किंचित वाढ झाली.