Share Market opening : मंगळवारी भारतीय शेअर बाजाराची सुरुवात चांगली झाली आहे. गुंतवणूकदारांची खरेदी आणि उत्तम जागतिक संकेतांमुळे भारतीय शेअर बाजाराची सकारात्मक सुरुवात झाली. आयटी, एनर्जी, बँकिंग क्षेत्रातील शेअर्समुळे तेजी दिसून आली. बीएसई सेन्सेक्स ४६७ अंकांच्या वाढीसह ७७,८०२ वर तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी १४१ अंकांच्या वाढीसह २३,५८५ अंकांवर व्यवहार करत आहे.
या शेअर्समध्ये तेजी / घसरण
आजच्या व्यवहारात सेन्सेक्सच्या ३० पैकी २६ शेअर्स वधारले, तर ४ घसरले आहेत. सर्वाधिक वेगानं वाढणाऱ्या शेअर्समध्ये टाटा मोटर्स २.१८ टक्के, एनटीपीसी २.१७ टक्के, महिंद्रा अँड महिंद्रा १.६१ टक्के, अदानी पोर्ट्स १.५५ टक्के, इन्फोसिस १.४७ टक्के, टीसीएस १.०१ टक्के, अल्ट्राटेक सिमेंट ०.८९ टक्के, टेक महिंद्रा ०.७९ टक्के, पॉवर ग्रिड ०.७५ टक्क्यांनी वधारले. तर दुसरीकडे कोटक महिंद्रा बँक ०.४९ टक्के, बजाज फिनसर्व्ह ०.४८ टक्के, सन फार्मा ०.२४ टक्के, अॅक्सिस बँक ०.०५ टक्क्यांनी घसरले.
संपत्तीत ४ लाख कोटींची वाढ
मंगळवारच्या सत्रात तेजीसह शेअर बाजार उघडल्यानं गुंतवणूकदारांच्या संपत्तीत जोरदार वाढ झाली आहे. बीएसईमध्ये सूचीबद्ध शेअर्सचे बाजार भांडवल ४३२.९६ लाख कोटी रुपयांवर पोहोचले आहे, जे मागील सत्रात ४२९.०८ लाख कोटी रुपये होते. आजच्या सत्रात गुंतवणूकदारांच्या संपत्तीत ३.८८ लाख कोटी रुपयांची वाढ झाली आहे.