- पी. व्ही. सुब्रमण्यम
शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवू, तिथं पैसा वाढीस तरी लागतो, थोडी रिस्क घेऊ, नशीब जोरावर असेल तर फायदा होईलच असं अनेक जण म्हणतात. त्यांच्यापैकी अनेकांचा प्रश्न असतो : शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक घेताना काय विचार करायचा? पहिलं म्हणजे ‘एकदम गुंतवणूक, एकदम मोठी झेप’ असा विचार करू नका. थोड्या रकमेने सुरुवात करा. शेअर्स खरेदी करण्यासाठी कंपनी निवडताना काही प्रश्न विचारायला शिका. हे प्रश्न म्हणजे काही रिसर्च नव्हे, साधे सामान्य प्रश्न आहेत.
१. त्या कंपनीचा बिझनेस काय आहे, ते नेमकं काम काय करतात?- इंडिगो विमानं उडविते, एचडीएफसी ही बँक आहे हे जसं आपल्याला माहिती असतं तसं आपण ज्या कंपनीचे शेअर्स खरेदी करणार तिचा मूळ व्यवसाय काय हे माहिती हवं.
२. कंपनीचा इतिहास काय, भूतकाळात या कंपनीने काय केलं, त्यांची पत काय? कंपनीचे तीन वर्षांचं बॅलन्सशीट काय सांगतं, या चालू क्वार्टरचे आकडे काय आहेत, दोन वर्षांपूर्वी कंपनी कुठं होती? त्यांनी जे ‘प्रेडिक्ट’ केलं होतं तशी प्रगती केली आहे का?
३. त्यांचे स्पर्धक कोण? स्पर्धक शेअर्सचे भाव काय?
४. या कंपनीचे मालक कोण? फॅमिली बिझनेस आहे की काॅर्पोरेट फर्म?
५. कंपनीची डिव्हिडंट पे पॉलिसी काय आहे? ज्यांना डिव्हिडंट मिळतो ते काय सांगतात. कंपनीबाबतच्या अनुभवासंदर्भात?
६. ही कंपनी मागच्या पानावर पुढे चालू आहे की अजूनही मोठं काही करण्याची आस आहे? कॉम्पिटिटिव्ह आहे का?
७. त्यांचा प्राइस अर्निंग कोट -पीई काय आहे? अर्थात, पीईवर अवलंबून सगळे निर्णय घेऊ नका, पीई ही दुधारी तलवार आहे, हे विसरू नका.
८. हे शेअर्स घेण्याचा तुमचा हेतू काय?
९. धोक्याचा इशारा : अलीकडच्या काळात कंपनी, व्यवस्थापन यासंदर्भात काही आर्थिक-सामाजिक घोटाळे झाले आहेत का?
- या मूलभूत प्रश्नांचा विचार करून मग ठरवा शेअर्स घ्यायचे का? किती घ्यायचे? किती पैसे गुंतवायचे? - इतका किमान विचार कराल, तर या जगात तुमच्या हाताला काही लागू शकतं. शेअर मार्केट हा केवळ नशिबाचा खेळ नाही, ते शहाणपणाच्या निर्णयाचंच जग आहे.