स्टार हेल्थ इन्शुरन्सच्या (Star Health) शेअरने केवळ 21 ट्रेडिंग सेशन्समध्ये, म्हणजेच एका महिन्यात आपल्या 52 आठवड्यांतील सर्वात खालच्या पातळीवरून तब्बल 51 टक्क्यांची उसळी घेतली आहे. शेअर बाजारातील दिग्गज गुंतवणूकदारराकेश झुनझुनवाला यांच्या पोर्टफोलिओतील हा शेअर 1 जुलै, 2022 रोजी 52 आठवड्यांतील खालच्या पातळीवर म्हणजेच 469.05 रुपयांवर होता. आज मंगळवारी कंपनीचा शेअर 1.44 टक्क्यांच्या तेजीसह 720 रुपयांवर पोहोचला आहे. गेल्या 1 ऑगस्टला स्टार हेल्थचा शेअर 710.20 रुपयांवर बंद झाला होता.
52 आठवड्यांतील उच्च पातळीपासून अद्यापही 23.3 टक्के भाव कमीच -
या शेअरने गुंतवणूकदारांना एका महिन्यात 44.59 टक्के एवढा परतावा दिला आहे. 2022 मध्ये हा शेअर 8 टक्क्यांनी घसरला होता. मात्र एका आठवड्यात 3.27 टक्के तेजी आली आहे. मात्र, असे असले तरी, स्टार हेल्थ इन्शुरन्सचा शेअर अद्यापही 10 डिसेंबर, 2021 च्या 52 आठवड्यांतील उच्च पातळीच्या म्हणजेच 940 रुपयांपेक्षा 23.3 टक्क्यांनी खालीच आहे.
झुनझुनवालांकडे कंपनीचे कोट्यवधी शेअर्स -
जून 2022 तिमाही शेअरहोल्डिंग पॅटर्न डेटा शो नुसार, राकेश झुनझुनवाला स्टार हेल्थचे प्रमोटर आहेत. राकेश झुनझुनवालांचा कंपनीत 14.39 टक्के वाटा आहे. अर्थात त्यांच्याकडे कंपनीचे 8.28 कोटी शेअर्स आहेत. तसेच, त्यांची पत्नी रेखा झुनझुनवाला यांच्याकडे 3.10 टक्के वाटा अर्थात 1.78 कोटी शेअर्स आहेत. म्हणजेच झुनझुनवाला कुटुंबाची कंपनीत 17.49 टक्के हिस्सेदारी आहे.