बुधवारी शेअर बाजारात मोठी घसरण पाहायला मिळाली. शेअर बाजारातील कामाकाजाची सुरुवातही निर्देशांकातील घसरणीसह झाली होती. कामकाजादरम्यान निफ्टी आणि सेन्सेक्समध्ये ही घसरण कायम राहिली. कामकाजाच्या अखेरच्या सत्रात बीएसईचा ३० समभागांचा सेन्सेक्स ९२८ अंकांनी किंवा १.५३ टक्क्यांनी घसरून ५९,७४४.९८ वर बंद झाला. दुसरीकडे, NSE चा निफ्टी २७२ अंकांनी घसरला आणि १७,५५४.३० च्या पातळीवर बंद झाला.
कामकाजाच्या सुरुवातीच्या सत्रात सेन्सेक्स २६३.९२ अंक किंवा ०.४३ टक्क्यांच्या घसरणीसह ६०,४०८.८० अंकांवर खुला झाला होता. तर निफ्टी इंडेक्स ६७.७० अंक किंवा ०.३८ टक्क्यांनी घसरुन १७,७५० अंकांवर खुला झाला होता. कामाकाजादरम्यान दुपारी साडेबाराच्या सुमारास सेन्सेक्समध्ये ७०० अकांपेक्षा अधिक घसरण होऊन शेअर बाजाराचा निर्देशांक ६० हजारांच्या खाली गेला.
बुधवारी शेअर बाजारात आलेल्या या घसरणीचं सर्वाधिक नुकसान गौतम अदानी यांच्या समूहातील अदानी एन्टरप्राईजेसच्या गुंतवणूकदारांना झालं. शेअर बाजाराचं कामकाज पूर्ण होईपर्यंत अदानी एन्टरप्राईजेसच्या शेअर्समध्ये ११.०५ टक्क्यांची घसरण होऊन ते १,३९७.५० रुपयांवर बंद झाले.
अदानींना मोठा फटकाअदानी समूहाच्या इतर समभागांबद्दल बोलायचे तर, अदानी विल्मरचे शेअर्स ५ टक्क्यांनी घसरून ३९०.३० रुपयांवर आले, अदानी पॉवरचे शेअर्सना लोअर सर्किट लावण्यात आलं आणि ते ५ टक्क्यांनी घसरून १६२.४५ रुपयांवर बंद झाले. याशिवाय, दिवसभराच्या व्यवहारानंतर, अदानी ग्रीनचे शेअर्स ५ टक्क्यांनी, अदानी पोर्ट्स आणि स्पेशल इकॉनॉमिक झोन ७.२५ टक्के, अदानी टोटल गॅस ५ टक्के, अदानी ट्रान्समिशन ५ टक्के, अंबुजा सिमेंट्स ५.०९ टक्के आणि ACC लिमिटेडच्या ४.१८ टक्क्यांनी घसरण झाली.
गुंतवणूकदारांचे ३.८८ लाख कोटी बुडालेशेअर बाजारातील या घसरणीमुळे गुंतवणूकदारांचे सुमारे ३.८८ लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले. या वर्षातील आतापर्यंतच्या घसरणीबद्दल बोलायचे तर सेन्सेक्स सुमारे १.७५ टक्क्यांनी आणि निफ्टी ३.०४ टक्क्यांनी घसरला आहे. अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हने पुन्हा एकदा व्याजदरात मोठी वाढ करण्याचे संकेत दिल्यानंतर मंगळवारी अमेरिकन बाजारातही भूकंप झाला. S&P ५०० आणि DOw Jones २ टक्क्यांनी घसरले. त्याच वेळी आशिया निक्केई १.३४ टक्के आणि हँग सेंग ०.५ टक्क्यांनी घसरले.