मुंबई : केंद्रीय अर्थसंकल्पाचा प्रभाव अजूनही शेअर बाजारावर असल्याचे दिसत आहे. केंद्रीय अर्थसंकल्प सादर होऊन आठवडा उलटला, तरी शेअर बाजारातील तेजी कायम असल्याचे दिसून येत आहे. सकाळी बाजार सुरू होताच निर्देशांकाने ५०० अंकांची झेप घेतली आणि तो ५१ हजार ३०० अंकांपुढे गेला. तर निफ्टीही १८० अंकांनी वधारला. अवघ्या तासाभरात गुंतवणूकदारांनी जवळपास एक लाख कोटींची कमाई केली आहे. (share market Sensex nifty today closing Indian benchmark ended above 51300)
मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक ६१७.१४ अंक म्हणजेच १.२२ टक्क्यांच्या वाढीसह ५१ हजार ३४८.७७ अंकांवर बंद झाला. तर, दुसरीकडे निफ्टीही १९१.५५ अंकांच्या वाढीसह १५ हजार ११५ अंकांवर बंद झाला. मुंबई शेअर बाजाराच्या मंचावर ३० पैकी २७ कंपन्यांचे शेअर तेजीत असल्याचे पाहायला मिळाले. यामध्ये महिंद्रा अँड महिंद्रा, अॅक्सिस बँक, डॉ. रेड्डी लॅब, आयटीसी, सन फार्मा, इन्फोसिस, बजाज फायनान्स, एसबीआय, आयसीआयसीआय बँक , ओएनजीसी, नेस्ले या कंपन्यांच्या शेअरमध्ये वाढ झाली.
शेअर बाजारात तेजीचा बोलबाला कायम
आगामी आठवड्यात काही कंपन्याचे तिमाहीत निकाल जाहीर होणार आहेत. तसेच अर्थसंकल्पानंतर शेअर बाजारात तेजीचा बोलबाला दिवसेंदिवस वाढत असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. अर्थसंकल्पात पुढील आर्थिक वर्षाचे ११ टक्के विकासदराचे उद्दिष्ट गुंतवणूकदारांना आश्वासक वाटत आहे. त्यामुळे खरेदीचा जोर कायम असल्याचेही सांगितले जात आहे.
सरकार आता कोरोना कर किंवा उपकर लावणार? निर्मला सीतारामन म्हणाल्या...
दिग्गज कंपन्यांचे समभाग तेजीत
दिवसभरात शेअर बाजारातील टाटा मोटर्स, हिंडाल्को, एम अँड एम, जेएसडब्ल्यू स्टील आणि श्री सीमेंट या कंपन्यांच्या समभागात तेजी दिसून आली, तर दुसरीकडे ब्रिटानिया, हिंदुस्तान युनिलिव्हर, डिविस लॅब, कोटक महिंद्रा बँक आणि बजाज फायनान्स या कंपन्यांच्या समभागात घसरण झाल्याचे पाहायला मिळाले.
दरम्यान, शेअर बाजाराच्या आकडेवारीनुसार शुक्रवारी परकीय संस्थात्मक गुंतवणूकदारांनी भांडवली बाजारात १ हजार ४६२ कोटींची खरेदी केली. अमेरिकन शेअर बाजार शुक्रवारी तेजीसह बंद झाला होता. तसेच आशियात बहुतेक भांडवली बाजारात तेजी असल्याचे पाहायला मिळत आहेत.