प्रसाद गो. जोशी
Share Market : केंद्रीय अर्थसंकल्पाचे बाजाराने जोरदार स्वागत केल्यानंतर आता पतधोरणाकडे बाजाराचे लक्ष लागून राहिले आहे. यामध्ये अपेक्षित काही घडल्यास बाजार वाढू शकतो. काही प्रमुख कंपन्यांचे तिमाही निकाल या सप्ताहात जाहीर होणार असून, त्यामुळेही बाजार अस्थिर राहू शकतो.
रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समितीच्या बैठकीचे निर्णय बुधवारी जाहीर होणार आहेत. त्यावर बाजाराची पुढची वाटचाल ठरेल, तसेच शुक्रवारी औद्योगिक उत्पादनाची आकडेवारी जाहीर होणार आहे. याशिवाय खनिज तेलाचे दर, रुपयांची वाटचाल आणि परकीय वित्तसंस्थांकडून होणारी कृती ही बाजाराची वाटचाल ठरविणार आहे. त्यामुळे हा सप्ताह बाजारासाठी हेलकावणारा सप्ताह ठरणार आहे.
गतसप्ताहातील स्थिती -
निर्देशांक बंद मूल्य फरक
सेन्सेक्स ५८,६४४.८२ १,४४४.५९
निफ्टी १७,५१६.३० ४१४.३५
मिडकॅप २४,७५०.६१ ५६३.८८
स्मॉलकॅप २९,७०२.५८ ७६२.४०
रिलायन्सचे भांडवलमूल्य घटले
गतसप्ताहामध्ये सर्वच प्रमुख निर्देशांकांमध्ये वाढ झाल्यामुळे बाजाराच्या भांडवलमूल्यामध्ये मोठी वाढ झाल्याचे दिसून आले आहे. या सप्ताहामध्ये बाजारातील एकूण नोंदणीकृत कंपन्यांच्या बाजार भांडवलमूल्यामध्ये ६,६३,५७४.५१ कोटी रुपयांची वाढ झाली आहे. बाजारातील पहिल्या दहा कंपन्यांपैकी आठ कंपन्यांचे बाजार भांडवलमूल्य वाढले आहे. ज्या दोन कंपन्यांचे बाजार भांडवलमूल्य कमी झाले, त्यामध्ये रिलायन्स इंडस्ट्रीज आणि एचडीएफसी या कंपन्यांचा समावेश आहे.
पैसे काढून घेण्याचा ट्रेंड सुरूच
परकीय वित्तसंस्थांकडून भारतीय बाजारातून पैसे काढून घेणे सुरूच आहे. फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या चार दिवसांमध्येच या संस्थांनी ६,८३४ कोटी रुपये काढून घेतले आहेत. या आधीच्या पहिल्या चार महिन्यांमध्ये या संस्था सातत्याने विक्री करीत असलेल्या दिसून आल्या आहेत.