Stock Market Closing On 27 June 2024 : गेल्या काही दिवसांपासून भारतीय Share Market नवनवीन रेकॉर्ड करत आहे. गुरुवारचा दिवस(दि.27 जून 2024) सेन्सेक्स आणि निफ्टीसाठी ऐतिहासिक ठरला. पहिल्यांदाच सेन्सेक्सने 79,000 आणि निफ्टीने 24,000 चा टप्पा ओलांडला. बाजारातील या वाढीचे श्रेय IT आणि Energy शेअर्संना जाते. आजच्या व्यवहाराअंती BSE सेन्सेक्स 569 अंकांच्या वाढीसह 79,243 अंकांवर, तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 175 अंकांच्या उसळीसह 24,044 अंकांवर बंद झाला.
मार्केट कॅपमध्ये वाढ
आजच्या ट्रेडिंग सत्रातील या दमदार वाढीमुळे मार्केट कॅपदेखील जोरदार वाढले. बीएसईवर लिस्टेड कंपन्यांचे मार्केट कॅप 438.69 लाख कोटी रुपयांवर बंद झाले, जे मागील सत्रात 437.02 लाख कोटी रुपयांवर आले होते. म्हणजेच, आजच्या सत्रात गुंतवणूकदारांच्या संपत्तीत 1.67 लाख कोटींची वाढ झाली आहे.
आजच्या सत्रात आयटी शअर्समध्ये मोठी वाढ दिसून आली. निफ्टीचा आयटी निर्देशांक 2 टक्क्यांनी वाढून बंद झाला. याशिवाय ऑटो, एफएमसीजी, मेटल्स, एनर्जी, हेल्थकेअर, ऑइल आणि गॅस क्षेत्रातील शेअर्समध्ये वाढ झाली. तर मीडिया, फार्मा आणि बँकिंग शेअर्समध्ये घसरण झाली. मिडकॅप शेअर्स वाढीसह बंद झाले, तर स्मॉलकॅप शेअर्स घसरणीसह बंद झाले.
वाढणारे आणि घसरणारे शेअर्स
आजच्या व्यवहारात अल्ट्राटेक सिमेंट 5.07 टक्के, एनटीपीसी 3.19 टक्के, जेएसडब्ल्यू स्किल 2.38 टक्के, टाटा मोटर्स 2.13 टक्के, इन्फोसिस 2.09 टक्के, टीसीएस 2.01 टक्के वाढीसह बंद झाले. तर, L&T 1.13 टक्के, सन फार्मा 0.42 टक्के, नेस्ले इंडिया 0.20 टक्के घसरले.
(टीप- हा गुंतवणुकीचा सल्ला नसून, आम्ही फक्त शेअर बाजाराच्या कामगिरीविषयी माहिती दिली आहे. शेअर बाजारात गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ञांचा सल्ला आवश्य घ्या.)