पुष्कर कुलकर्णी गुढीपाडवा म्हणजे मराठी महिन्याची सुरुवात. चैत्रात नवी पालवी फुटते. नवं चैतन्य दरवळत असते. मनात उत्साह वाढलेला असतो. या सकारात्मक वातावरणात गुढी उभारून फक्त गोडधोड खाऊन दिवस व्यर्थ घालवू नका. स्वतःचे आणि कुटुंबाचे भविष्य उज्ज्वल होण्यासाठी आजच आर्थिक नियोजनाची गुढी उभारा.
आर्थिक नियोजन करताना विविध गुंतवणुकीच्या पर्यायांमधून शेअर बाजारातील थेट गुंतवणूक हा पर्याय टॉप प्रायोरिटीवर ठेवा. गुंतवणुकीसाठी दीर्घकाळाचा विचार करा. कमीतकमी १० ते १५ वर्षांचा. या लेखात काही महत्त्वाचे सेक्टर्स निवडले असून यात समावेश असणाऱ्या अनेक चांगल्या कंपन्यांचे शेअर्स आपण खरेदी करण्याचा विचार करू शकता. गेल्या १५ ते २० वर्षांचा विचार केल्यास अनेक दिग्गज कंपन्यांनी गुंतवणूकदारांस कैक पटींचा परतावा दिला आहे.
या क्षेत्रासाठी येणार काळ चांगला असेल. विशेषतः इलेक्ट्रिक वाहने खरेदी करण्यावर ग्राहकांचा भर राहील. यामुळे अशा वाहन उत्पादन आणि बॅटरी उत्पादन कंपन्यांचे उत्पादन आणि विक्रीत वाढ होण्याची शक्यता दाट आहे. मारुती, अशोक लेलँड, बजाज ऑटो, भारत फोर्ज, आयशर मोटर्स, हिरो, महिंद्रा अँड महिंद्रा अशा अनेक नामवंत कंपन्या या क्षेत्रात अग्रेसर आहेत.
सॉफ्टवेअर क्षेत्र तर जागतिक अर्थव्यवस्थेत मोलाचा हातभार लावतात. आपण सर्व जाणतो की, प्रत्येक क्षेत्रात आयटी/सॉफ्टवेअरचे महत्त्व किती मोठे आहे. आयटी ही नुसतीच गरज नसून त्यावर बहुतांश अस्तित्वच अवलंबून आहे. टीसीएस, विप्रो, इन्फोसिस, एल. अँड टी. इन्फोटेक, एचसीएल टेक, टेक महिंद्रा या सारख्या दिग्गज कंपन्या या क्षेत्रात येतात.
या क्षेत्रास तसे मरण नाही. घरगुती आणि औद्योगिक पेंट, शेती खते आणि फवारणी, औषधे, कॉस्मेटिक, सॅनिटरी व ग्राहकोपयोगी वस्तू, आणि इतर औद्योगिक उत्पादने यात केमिकलचा वापर होत असतो. अशा उत्पादनांची मागणी वाढतच असते. केमिकल क्षेत्रात एशियन पेंट्स, आरती इंडस्ट्रीज, गुजरात केमिकल्स, अतुल अशा उत्तम कंपन्या आहेत.
इन्फ्रा, मेटल, फार्मा, बँकिंग अशी सेक्टर्स आहेत ज्यात अनेक चांगल्या कंपन्या कार्यरत आहेत. शेअर निवडताना शक्यतो लार्ज कॅप (ज्यांचे भाग भांडवल २० हजार कोटींच्या वर असते) अशा कंपन्या निवडा. त्यांचा फंडामेंटल अभ्यास अवश्य करा.
दैनंदिन ग्राहक उपयुक्त उत्पादन आणि विक्री करणाऱ्या कंपन्यांचा या सेक्टरमध्ये समावेश असतो. जशी लोकसंख्या वाढते तशी या उत्पादनास मागणी वाढत जाते. या क्षेत्रांत नेस्ले, डाबर, हिंदुस्थान युनिलिव्हर, गोदरेज कंझ्युमर टाटा कन्झ्युमर, डी मार्ट इत्यादी नामवंत कंपन्या आहेत.
हा सेक्टरसुद्धा सदाबहार सेक्टर आहे. सध्या ग्रीन एनर्जी जोमात आहे. तसेच दैनंदिन गरज म्हणून विद्युत पुरवठा करणाऱ्या कंपन्यांनासुद्धा चांगले दिवस आहेत. इंधन जी दैनंदिन गरज आहे हे सुद्धा याच सेक्टरमध्ये मोडते. रिलायन्स, टाटा पवार, अदानी ग्रीन्स, इंडियन ऑइल भारत पेट्रोलियम, एनर्जी एक्सचेन्ज अशा चांगल्या कंपन्या या क्षेत्रात आहेत.
नॉन बँकिंग फायनान्सियल हे क्षेत्र गेल्या अनेक वर्षात दमदार वाढले आहे. मूळ बँकिंग सोडून अनेक प्रकारच्या वित्तीय सेवा देणाऱ्या कंपन्या या क्षेत्रात येतात. ग्राहकांना कर्ज, गृह कर्ज, सोने तारण ठेवून कर्ज, औद्योगिक आस्थापनांना कर्ज देणे अशा सेवा या कंपन्या देतात. बजाज फायनान्स, बजाज फिनसर्व, कोटक, एचडीएफसी, आयसीआयसीआय, मुथूट इत्यादी कंपन्या या क्षेत्रात येतात.
गेल्या तीन / चार वर्षांतील कंपनीची उलाढाल आणि निव्वळ नफा याचा आलेख जर उंचावत असल्यास आपण गुंतवणूक करू शकता. शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमीची असते. परंतु अभ्यासपूर्ण आणि दीर्घ काळाचा विचार केला तर निश्चित फायदेशीर ठरू शकते.