Join us  

मंदीच्या भीतीने बाजार धास्तावला; अस्थिरतेच्या वातावरणात गुंतवणूक सांभाळा!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2023 6:42 AM

अपेक्षेनुसार भारतीय शेअर बाजार गतसप्ताहामध्ये कोसळलाच.

- प्रसाद गो. जोशी

अमेरिकेतल्या बँकिंग संकटाची झळ भारतीय शेअर बाजाराला बसली असून, आता सावधपणे पुढची पावले काय पडतात याकडे पाहणे गरजेचे आहे. भारतातील बँकिंगला या संकटाची झळ फारशी बसणार नसली तरी सध्याच्या वातावरणात गुंतवणूकदारांनी गुंतवणूक सर्वच क्षेत्रांमध्ये विखुरलेली राखणे गरजेचे आहे. त्यामुळे आपल्या गुंतवणुकीला मोठा फटका बसणार नाही, याची काळजी घेतली जाऊ शकेल.

अपेक्षेनुसार भारतीय शेअर बाजार गतसप्ताहामध्ये कोसळलाच. अखेरच्या दोन दिवसांमध्ये झालेल्या काही गुंतवणुकीमुळे बाजारातील तोटा कमी दिसत असला तरी एकूण सप्ताह तोट्याचाच राहिला. मुंबई शेअर बाजाराचा संवेदनशील निर्देशांक ११४५.२३ अंशांनी खाली येऊन ५७,९८९.९० अंशांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक (निफ्टी) १७,१००.०५ अंशांवर बंद झाला. मागील सप्ताहाच्या तुलनेत त्यामध्ये ३१२.८५ अंशांची घट झाली. गतसप्ताहात बाजाराचे सर्वच निर्देशांक लाल रंगामध्ये बंद झाले. 

अमेरिकेतील बँकिंग संकटाची व्याप्ती वाढत असली तरी त्याचा भारतावर थेट परिणाम होण्याची शक्यता कमी आहे. मात्र, जगभरातील शेअर बाजारांना याचा फटका बसल्यामुळे भारतीय बाजारही गतसप्ताहात खाली आला. त्यातच परकीय वित्तसंस्थांनीही येथून पैसा काढून घेणे सुरूच ठेवल्याने घसरण आणखी वाढली. गतसप्ताहामध्ये परकीय वित्तसंस्थांनी भारतातून ७९५३.६६ कोटी रूपये काढून घेतले. त्याचवेळी देशांतर्गत वित्तसंस्थांनी मात्र बाजारात ९२३३.०५ कोटी रुपयांची गुंतवणूक करून बाजारची घसरण रोखण्याचा प्रयत्न केला. खनिज तेलाच्या किमतीत मोठी घट झाली असून, जागतिक मंदीच्या भीतीने बाजार धास्तावला आहे. 

२ लाख काेटींनी दहा कंपन्यांचे भांडवल घटलेगतसप्ताहामध्ये बाजारात मोठ्या प्रमाणात विक्री होत असल्याो निर्देशांकांमध्ये घट  झाली आले. त्याचा परिणाम देशातील पहिल्या १० कंपन्यांच्या बाजार भांडवलमूल्यामध्ये घट होण्यामध्ये झाला आहे. या सर्वच्या सर्व १० कंपन्यांचे भांडवल  २.०९ लाख कोटी रुपयांनी कमी झाले आहे. याचा सर्वाधिक फटका रिलायन्स इंडस्ट्रीजला बसला आहे. बाजारात एकूण नोंदणीकृत असलेल्या कंपन्यांच्या भांडवलामध्ये ५ लाख ४१ हजार ८०६.०९ कोटी रुपयांची घट झाली आहे. सप्ताहाच्या अखेरीस एकूण बाजार भांडवलमूल्य २,५७,५२,९१७.५६ कोटी रुपयांवर गेले आहे.

टॅग्स :शेअर बाजार