Ola Electric News: अनेक कारणांमुळे ओला इलेक्ट्रिक ही कंपनी चर्चेत असते. परंतु आता पुन्हा एकदा होणाऱ्या कर्मचारी कपातीमुळे ओला चर्चेचा विषय ठरत आहे. भारतातील आघाडीची इलेक्ट्रिक स्कूटर उत्पादक कंपनी ओला इलेक्ट्रिकनं आपल्या खर्चावर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि वाढता तोटा कमी करण्यासाठी १,००० हून अधिक कर्मचारी आणि कंत्राटी कामगारांना काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, खरेदी, सप्लाय, कस्टमर रिलेशन आणि चार्जिंग इन्फ्रास्ट्रक्चरसह अनेक विभागांमध्ये ही कपात करण्यात आली आहे. याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊ.
दुसऱ्यांदा कर्मचारी कपात
गेल्या पाच महिन्यांत दुसऱ्यांदा ओला इलेक्ट्रिकनं कर्मचारी कपात करण्याचा निर्णय घेतलाय. ब्लूमबर्गनं यासंदर्भातील वृत्त दिलंय. सॉफ्टबँक ग्रुप कॉर्पचा पाठिंबा असूनही गेल्या काही महिन्यांपासून कंपनी संकटात सापडली आहे. अलीकडेच कंपनीच्या डिसेंबर तिमाहीतील तोट्यात ५० टक्क्यांनी वाढ झाली असून, बाजार नियामक आणि केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणानं त्यावर लक्ष ठेवलंय.
नोव्हेंबर २०२३ मध्ये ओला इलेक्ट्रिकने सुमारे ५०० कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकलं. मार्च २०२४ अखेरपर्यंत कंपनीत सुमारे ४००० कर्मचारी कार्यरत होते, त्यापैकी २५% पेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना यावेळी कामावरून काढून टाकण्यात आलंय.
ऑटोमेशन आणि कॉस्ट कटिंग स्ट्रॅटेजी
ओला इलेक्ट्रिक आता आपल्या ग्राहक सेवेच्या कामकाजाचं ऑटोमेशन करण्यावर लक्ष केंद्रित करत आहे, जेणेकरून कंपनीचा खर्च कमी होऊ शकेल. ब्लूमबर्गच्या रिपोर्टनुसार, कंपनीनं आपल्या फ्रंट-एंड ऑपरेशन्सला मान्यता दिली आहे आणि ऑटोमॅटिक केलं आहे, ज्यामुळे नफा सुधारण्यास, खर्चात कपात करण्यास आणि ग्राहकांचा अनुभव सुधारण्यास मदत झाली आहे. त्याचबरोबर अनावश्यक पदं हटवून उत्पादकता वाढविण्यात आली आहे.
याशिवाय कंपनी आपल्या शोरूम आणि सर्व्हिस सेंटरमध्ये काम करणाऱ्या सेल्स, सर्व्हिस आणि वेअरहाऊस स्टाफलाही कमी करत आहे. लॉजिस्टिक्स आणि डिलिव्हरी स्ट्रॅटेजीमध्ये पुन्हा सुधारणा करणं, ऑपरेटिंग कॉस्ट कमी करणं हे या कर्मचारी कपातीचं मुख्य उद्दीष्ट आहे.
बाजारातील हिस्सा कमी झाला
ऑगस्ट २०२३ मध्ये आयपीओ लाँच झाल्यापासून ओला इलेक्ट्रिकच्या शेअरमध्ये ६० टक्क्यांपर्यंत घसरण झाली आहे. गेल्या काही वर्षांत कंपनीच्या ग्राहकांच्या तक्रारी, सोशल मीडियावर टीका आणि बाजारातील हिस्सा घसरल्याचा कंपनीला सामना करावा लागला आहे.
(टीप - यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)