Join us

आयआरएफसीचे समभाग होणार गुंतवणूकदारांसाठी सोमवारी खुले

By ऑनलाइन लोकमत | Published: January 14, 2021 2:27 AM

दर्शनी मूल्य दहा रुपये असलेला समभागाची किंमत २५ ते २६ रुपये प्रतिसमभाग निश्चित करण्यात आली आहे. यातून उभारण्यात आलेला निधी रेल्वेच्या पायाभूत सुविधा सक्षम करण्यासाठी वापरला जाणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क पिंपरी : भारतीय रेल्वेचा आर्थिक कणा मानला जाणाऱ्या इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेडचे (आयआरएफसी) समभाग येत्या सोमवार (दि. १८) ते बुधवार (दि. २०) पर्यंत गुंतवणुकदारांसाठी खुले होणार आहेत. समभाग ५७५ आणि त्या पटीत खरेदी करता येणार आहेत. आयआरएफसीचे चेअरमन अमिताभ बॅनर्जी यांनी बुधवारी (दि. १३) व्हिडिओ कॉन्फरन्सिंगमध्ये त्याची घोषणा केली.

दर्शनी मूल्य दहा रुपये असलेला समभागाची किंमत २५ ते २६ रुपये प्रतिसमभाग निश्चित करण्यात आली आहे. यातून उभारण्यात आलेला निधी रेल्वेच्या पायाभूत सुविधा सक्षम करण्यासाठी वापरला जाणार आहे. त्यामुळे भारतीय रेल्वेला बळकटी मिळेल. प्रवासी क्षमता वाढविणे, रेल्वे मार्गाचे विद्युतीकरण करणे, रेल्वे मार्गाची उभारणी करणे असे विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. तसेच, सध्या दररोज साडेनऊ किलोमीटरचे मार्ग उभारण्यात येत आहे. त्यात २०२२ पर्यंत १९ किलोमीटर प्रतिदिनपर्यंत वाढ करण्याचे उद्दीष्ट आहे. केवळ मालवाहतुकीचे जाळे उभारण्यासाठी कॉरीडोअर उभारण्यात येणार आहे. डिसेंबर २०२१ पर्यंत त्याची उभारणी करण्यात येणार आहे. त्यातही आयआरएफसी गुंतवणूक करणार आहे.हाय स्पीड रेल्वेमध्ये गुंतवणुकीचा प्रस्ताव दाखल झाला आहे. मात्र, मेट्रो अथवा बुलेट ट्रेनमध्ये गुंतवणूक करण्याचा बाबत प्रस्ताव नसल्याची माहिती चेअरमन बॅनर्जी यांनी दिली.

टॅग्स :व्यवसायरेल्वे