LIC share price: गेल्या ४ महिन्यांत सरकारी विमा कंपनी लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशनच्या (LIC) शेअरच्या किमतीत झपाट्यानं वाढ झाली आहे. या काळात कंपनीच्या शेअर्सची किंमत ६०० ते १०६६ रुपयांपर्यंत पोहोचली. म्हणजेच या कालावधीत कंपनीनं आपल्या पोझिशनल गुंतवणूकदारांना ७५ टक्के परतावा दिला आहे. पण एलआयसीच्या शेअर्समध्ये वाढ होण्याचे कारण काय, असा प्रश्न सर्वांच्या मनात आला असेल.
शेअर बाजाराशी संबंधित तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार चालू आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीतील मजबूत कामगिरीमुळे एलआयसीच्या शेअर्समध्ये वाढ झाली आहे. एलआयसीचे शेअर्स डिस्काऊंटवर ट्रेड करत होते, असंही ते म्हणाले.
काय म्हणाले तज्ज्ञ?
एलआयसीच्या शेअर्सच्या वाढीमागील प्रश्नावर, स्टॉकबॉक्सचे रिसर्च अॅनालिसिस्ट श्रेयांस व्ही शाह यांनी प्रतिक्रिया दिली. “कंपनीच्या शेअर्सच्या वाढीमागे अनेक कारणे आहेत. डिसेंबर तिमाहीत कंपनीच्या निव्वळ नफ्यात झालेली ४९ टक्के वाढ हे एक कारण आहे. याशिवाय कंपनीला कर परतावा म्हणून २१,७४१ कोटी रुपये मिळाले आहेत. या सर्व कारणांमुळे एलआयसीच्या शेअर्समध्ये वाढ झाली आहे," असं ते म्हणाले.
(टीप - यामध्ये शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. यातील तज्ज्ञांची मतं ही त्यांची वैयक्तिक मतं आहेत. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)