Join us

बुलेट ट्रेनच्या स्पीडनं पळणाऱ्या रेल्वे कंपनीच्या शेअर्सना 'ब्रेक', एका वृत्तानंतर ११ टक्क्यांनी आपटला

By ऑनलाइन लोकमत | Published: February 09, 2024 1:30 PM

कंपनीचे शेअर्स बीएसईमध्ये 9 टक्क्यांच्या घसरणीसह 256.15 रुपयांच्या पातळीवर उघडले.

RVNL Share Price: रेल्वे क्षेत्रातील मालामाल करणारी कंपनी रेल विकास कॉर्पोरेशन लिमिटेडच्या (Rail Vikas Corporation Limited) शेअर्समध्ये आज मोठी घसरण झाली आहे. कंपनीचे शेअर्स बीएसईमध्ये 9 टक्क्यांच्या घसरणीसह 256.15 रुपयांच्या पातळीवर उघडले. कंपनीची इन्ट्रा डे लो लेव्हल 11 टक्क्यांच्या घसरणीसह 250.40 रुपये प्रति शेअर आहे. यापूर्वी गुरुवारी बीएसईवर कंपनीचे शेअर्स 281.70 रुपयांच्या पातळीवर बंद झाले होते. कंपनीच्या शेअर्समध्ये झालेल्या घसरणीला डिसेंबर तिमाहीचा निकाल कारणीभूत असल्याचं म्हटलं जातंय. 

कंपनीचा निव्वळ नफा घसरला 

रेल विकास निगमनं गुरुवारी आपले तिमाही निकाल जाहीर केले. कंपनीनं दिलेल्या माहितीनुसार ऑक्टोबर ते डिसेंबर 2023 दरम्यान कंपनीचा निव्वळ नफा 358.60 कोटी रुपये होता. मागील वर्षी याच तिमाहीत कंपनीचा निव्वळ नफा 382.40 कोटी रुपये होता. म्हणजेच वार्षिक आधारावर कंपनीच्या निव्वळ नफ्यात 6.3 टक्क्यांची घट झाली आहे.  

कसा होता महिन्यभराचा कालावधी ? 

गेल्या एका महिन्यात रेल विकास निगमच्या शेअर्सच्या किमतीत 40 टक्क्यांची वाढ झाली आहे. मात्र, गेल्या 5 दिवसांत हा शेअर 11 टक्क्यांनी घसरलाय. गेल्या 6 महिन्यांबद्दलच्या शेअरच्या कामगिरीविषयी सांगायचं झालं तर रेल विकास निगमच्या शेअरची किंमत 103 टक्क्यांनी वाढली आहे. त्याच वेळी, गेल्या वर्षभरात 256 टक्क्यांचा नफा झालाय.  

शेअर बाजारात कंपनीचा 52 आठवड्यांचा उच्चांकी स्तर 345.60 रुपये आहे. तर, 52 आठवड्यांची नीचांकी पातळी 56.15 रुपये प्रति शेअर आहे.  

(टीप - यामध्ये शेअरच्य कामगिरीविषयी माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

टॅग्स :रेल्वेशेअर बाजारशेअर बाजार