Join us

आधी कमावले, मग गमावले! एका शेअरमुळे राकेश झुनझुनवालांचे ४८० कोटींचे नुकसान

By ऑनलाइन लोकमत | Published: June 08, 2022 2:09 PM

जून महिन्याच्या सुरुवातीलाच राकेश झुनझुनवाला यांना ७२० कोटी रुपयांचा नफा झाला होता. मात्र, अवघ्या काही दिवसांत मोठे नुकसान सोसावे लागले.

नवी दिल्ली: जागतिक घडामोडींचे तीव्र पडसाद भारतीय शेअर बाजारावर उमटताना दिसत आहेत. यातच आता बिग बुल म्हणून ओळखले जाणारे दिग्गज गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला (Rakesh Jhunjhunwala) यांना पुन्हा एकदा मोठा झटका बसला आहे. एका कंपनीच्या शेअरमुळे राकेश झुनझुनवाला यांचे मोठे नुकसान झाले आहे. गेल्या महिन्यात ७२० कोटींची दणदणीत कमाई करणाऱ्या राकेश झुनझुनवाला यांना अवघ्या काही दिवसांत ४८० कोटींचे नुकसान सोसावे लागले आहे. 

राकेश झुनझुनवाला यांचे टाटा ग्रुपच्या टायटन कंपनीत प्रचंड शेअर्स आहेत. टायटनचे शेअर्समध्ये सुरुवातीच्या व्यापारातच प्रचंड घसरण झाली. टाटा समूहाच्या या कंपनीचे शेअर्स ४.८८ टक्क्यांनी घसरून २०९१.०५ रुपये झाले. टायटनचे शेअर्स गेल्या अनेक दिवसांपासून घसरत आहेत आणि गेल्या पाच ट्रेडिंग सत्रांमध्ये ते ५.९१ टक्क्यांनी घसरले. सन २०२२ मध्ये आतापर्यंत हा स्टॉक १७ टक्क्यांनी घसरला आहे. 

राकेश झुनझुनवालांना मोठे नुकसान

दिग्गज गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला यांचे मोठे नुकसान झाले आहे. राकेश झुनझुनवाला आणि त्यांची पत्नी रेखा झुनझुनवाला यांच्याकडे टायटन कंपनीचे शेअर्स आहेत. ट्रेंडलाइननुसार, राकेश झुनझुनवाला यांच्याकडे मार्च २०२२ पर्यंत टायटनमध्ये ३५,३१०,३९५ शेअर्स किंवा ३.९८ टक्के स्टेक आहेत. त्यांची पत्नी रेखा झुनझुनवाला यांच्याकडे कंपनीचे ९,५४०,५७५ शेअर्स किंवा १.७ टक्के स्टेक आहेत. टायटनच्या शेअर्समध्ये १०७.५० रुपयांची घसरण झाल्यामुळे झुनझुनवाला दाम्पत्याला सुमारे ४,८२१,४७९,२७५ रुपयांचे नुकसान झाले आहे.

दरम्यान, तिसऱ्या तिमाहीच्या आकडेवारीनुसार टायटन कंपनीला या कालावधीत कंपनीचा नफा वार्षिक १३५.६ टक्क्यांनी वाढून ९८७ कोटी रुपये झाला आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत तो ४१९ कोटी रुपये होता. तिसर्‍या तिमाहीत टायटनची कमाई ३०.६ टक्क्यांनी वाढून ९,५१५ कोटी रुपये झाली आहे, जी मागील वर्षी याच कालावधीत ७,२८७ कोटी रुपये होती.  

टॅग्स :राकेश झुनझुनवालाशेअर बाजार