मुंबई : आरबीएल बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) आणि व्यवस्थापकीय संचालक विश्ववीर आहुजा यांनी कार्यकाळ संपण्यापूर्वीच पदमुक्त हाेण्याचा निर्णय घेतला. भारतीय रिझर्व्ह बँकेने मुख्य सरव्यवस्थापक याेगेश दयाल यांची बँकेच्या संचालक मंडळात अतिरिक्त संचालक म्हणून नियुक्ती केल्यानंतर आहुजा यांनी हा निर्णय घेतला आहे. त्यानंतर राजीव आहुजा यांची अंतरिम सीईओ आणि व्यवस्थापकीय संचालक पदावर तत्काळ नियुक्ती केली आहे.
या वृत्तामुळे सोमवारी शेअर बाजारात बॅंकेच्या शेअर्सचे भाव मोठ्या प्रमाणात कमी झाले. त्यामुळे बॅंकेचे गुंतवणुकदार हादरले.विश्ववीर आहुजा हे जुलै २०१० मध्ये सीईओ व व्यवस्थापकीय संचालक झाले हाेते. त्यांना तीन वर्षांची मुदतवाढ देण्यासाठी बँकेच्या संचालक मंडळाने आरबीआयकडे प्रस्ताव दिला हाेता. मात्र, आरबीआयने केवळ एका वर्षाचीच मुदतवाढ दिली हाेती. बँकेचे मुख्यालय मुंबईत आहे.
- या घडामाेडीनंतर बँकेच्या खातेदारांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले हाेते. शेअर बाजारातही बँकेचा शेअर काेसळला. मात्र, राजीव आहुजा यांनी खातेदारांना आश्वस्त केले. बँकेला आरबीआयचा पूर्ण पाठिंबा असून, ॲसेट क्वाॅलिटी आणि डिपाॅझिटबाबत काळजी करण्याचे कारण नसल्याचे ते म्हणाले.