शार्क टँक इंडियामध्ये (Shark Tank India) सहभागी झालेलं स्टार्टअप दोरजे टीस (Dorje Teas) सध्या अडचणीत सापडलं आहे. सोनी पिक्चर्स नेटवर्क्स इंडियाच्या टीमनं (Sony Pictures Networks India) स्टार्टअपला कॉपीराइट उल्लंघनाची नोटीस पाठवली आहे. ते स्टार्टअप आपल्या यूट्यूब आणि मेटा जाहिरातींमध्ये शार्क टँक इंडियातील आपल्या पिचचा वापर करत आहे आणि हे कॉपीराइटचं उल्लंघन आहे, असं नोटीसमध्ये म्हटलंय.
स्टार्टअपचे फाऊंडर स्पर्श अग्रवाल यांनी याबाबत लिंक्डइन पोस्ट केली आहे. त्या पोस्टमध्ये त्यांनी सोनीच्या वतीनं आपल्याला नोटीस पाठवण्यात आल्याचं म्हटलंय. केवळ आपल्यालाच नाही, तर आणखीही काही लोकांना या नोटिसा पाठवण्यात आल्याचं स्पर्श अग्रवाल म्हणाले. शार्क टँकमध्ये आलेल्या सर्व स्टार्टअप्सना सोनीकडून नोटिसा पाठवण्यात आल्याचं त्यांनी म्हटलंय.
कॉपीराईटचं उल्लंघन आहे असा कोणताही कायदा आपल्याला दिसला नसल्याचं कॉपीराईट कायद्याबद्दल बोलताना स्पर्श अग्रवाल म्हणाले. शार्क टँक इंडिया लोकप्रिय करण्यासाठी आम्ही काम करत आहोत, यात त्यांना काय समस्या आहे? असा सवालही त्यांनी केला.
दोरजे टीस (Dorje Teas), स्किपी (Skippi), असेंब्ली (Assembly), परफोरा (Perfora), हूवू फ्रेश (Hoovu Fresh), बियॉन्ड स्नॅक (Beyond Snack), वाकाओ फूड्स (Wakao Foods), नाशर माइल्स (Nasher Miles) आदी स्टार्टअप्सनी शार्क टँकच्या कंटेंटच्या प्रमोशनसाठी दरमहिन्याला कोट्यवधी रुपये खर्च केले आहेत. यामुळे शार्क टँकला मोफत प्रसिद्धी मिळत असल्याचंही स्पर्श अग्रवाल म्हणाले.