Join us  

मल्ल्याच्या बंगल्यासाठी शेल कंपन्यांचा पैसा?

By admin | Published: March 23, 2017 12:41 AM

बँकांचे हजारो कोटी बुडवून देशाबाहेर पळून गेलेले प्रख्यात उद्योगपती विजय मल्ल्या यांचा बंगळुरूमधील २0 दशलक्ष डॉलरचा

नवी दिल्ली : बँकांचे हजारो कोटी बुडवून देशाबाहेर पळून गेलेले प्रख्यात उद्योगपती विजय मल्ल्या यांचा बंगळुरूमधील २0 दशलक्ष डॉलरचा बंगला ‘स्काय मॅन्शन’ आज राज्यसभेत गाजला. या बंगल्याचे बांधकाम करण्यासाठी बनावट कंपन्यांच्या (शेल कंपन्या) माध्यमातून पैसे आले का, याची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी राज्यसभेत करण्यात आली.जेडीयूचे सदस्य हरिवंश यांनी शून्य प्रहरात हा मुद्दा उपस्थित केला. त्यांनी सांगितले की, बेकायदेशीर कारवाया, मनी लाँड्रिंग आणि काळा पैसा पांढरा करणे यासारख्या कारवायांत शेल कंपन्या प्रमुख माध्यम बनल्या आहेत. प्राप्तिकर विभागाने अलीकडेच अशा शेल कंपन्यांवर कारवाई केली आहे. तथापि, ही कारवाई एकांगी आणि केवळ मोजक्या कंपन्यांविरुद्ध करण्यात आल्याचा ठपका कॅगने प्राप्तिकर विभागावर ठेवला आहे.देशात १५ लाख कंपन्यांची नोंदणी आहे. तथापि, त्यापैकी केवळ ६ लाख कंपन्या प्राप्तिकर भरतात, असे नमूद केल्यानंतर हरिवंश यांनी मल्ल्या यांच्या बंगल्याचा संदर्भ दिला. मल्ल्या यांचे थेट नाव घेण्याचे मात्र त्यांनी टाळले. त्यांनी म्हटले की, बंगळुरूत ४0 हजार वर्गफुटाचे दोन पातळ्यांवरील पेंटहाऊस आहे. त्यात हेलिपॅडही आहे. हे पेंटहाऊस अशा माणसाचे आहे, ज्याच्याकडे स्टेट बँक आॅफ इंडियाचे ६,२0३ कोटी रुपयांचे कर्ज आहे. व्याजासह ही रक्कम ९ हजार कोटी रुपये होते. या बंगल्याचे बांधकाम आणि त्यावरील खर्च यांचा शेल कंपन्यांशी काही संबंध आहे का, याचा तपास व्हायला हवा.