मुंबई : शेअर बाजाराचा शहेनशहा म्हणून ओळखली जाणारी ब्रोकिंग कंपनी शेरखान अडचणीत आली असून जवळपास 400 कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
शेअरखान ही बीएनपी परिबासची ब्रोकिंग फर्म आहे. ऑनलाईन ट्रेडिंगमध्ये गुंतवणूकदारांचे पैसे ही कंपनी गुंतवत असते. ऑनलाईनद्वारे ही कंपनी गुंतवणूकदारांना मार्गदर्शनही करत असते. ही कंपनी ऑनलाईन ब्रोकिंग मॉडेल आणि महसूल कमी झाल्याने कर्मचारी कपात करत असल्याचे कंपनीने सांगितले.
जवळपास 400 जणांना नोकरी सोडण्यास सांगण्यात आले आहे, आणखी काही जणांना पुढील काही आठवड्यांत कंपनी सोडण्यास सांगण्यात येणार असल्याचे कंपनीतील सूत्रांनी सांगितले. यातील बरेचशे कर्मचारी हे विक्री आणि मदतनिस म्हणून काम करतात. इकॉनॉमिक्स टाईम्सने हे वृत्त दिले आहे. कंपनीला पाठविलेल्या मेलला कंपनीने उत्तर दिले आहे. यामध्ये 350 कर्मचाऱ्यांना कंपनी सोडण्यासा सांगितल्याचे म्हटले आहे.
शेरखानकडे सध्या तीन हजारावर कर्मचारी आहेत. मात्र, अन्य कर्मचाऱ्यांनाही कामावरून कमी करण्याबाबत कंपनीने खुलासा केलेला नाही.