नवी दिल्ली - केंद्रीय वाणिज्य आणि उद्योगमंत्री पियुष गोयल यांनी टाटा उद्योग समुहावर प्रहार केला आहे. गोयल यांनी भारतातील उद्योजकांचे धोरण देशविरोधी असल्याचे म्हटल्याने चांगलाच वाद निर्माण झाला आहे. गोयल यांनी विशेषत: टाटा उद्योग समुहाला लक्ष्य केले. कन्फेडरेशन ऑफ इंडिया इंडस्ट्रीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत पियुष गोयल यांनी व्हिडिओ कॉन्फरेन्सिंगच्या माध्यमातून सहभाग नोंदवला होता.
पियुष गोयल यांनी सीआयआयच्या सभेत बोलताना उद्योजकांना लक्ष्य केले आहे. द हिंदूने दिलेल्या वृत्तानुसार, गोयल यांनी आपल्या भाषणात सातत्याने टाटा उद्योग समुहावर टीका केली. आपल्यासारखी कंपनी?, एक-दोन कदाचित आपण विदेशी कंपनी खरेदी केली... तर त्याचे महत्त्व वाढले का. देशहित कमी झाले? असा सवाल गोयल यांनी उपस्थित केला. गोयल यांनी टाटा सन्सचा उल्लेख करत, त्यांनी ग्राहकांच्या मदतीसाठी बनविण्यात आलेल्या नियमांना विरोध केल्याचे सांगितले. गोयल यांच्या या विधानावरुन त्यांच्यावर टीका होत आहे. उद्योग जगतासह विरोधी पक्षानेही गोयल यांच्या विधानावर तीव्र आक्षेप घेतला आहे.
ज्येष्ठ काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी पियुष गोयल यांच्यावर पलटवार केला आहे. भारतीय उद्योगांसंदर्भात गोयल यांनी केलेल्या विधानामुळे आपण स्तब्ध आहोत, पहिल्यांदा राज्यसभेत कामकाज चालले नसल्याचे निश्चित केले, त्यानंतर हे विचित्र विधान, असे जयराम रमेश यांनी म्हटले आहे. तसेच, काँग्रेस प्रवक्ता जयवीर शेरगील यांनीही गोयल यांच्यावर निशाणा साधला. गोयल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या 'इज ऑफ डूईँग बिझनेस इन इंडिया'च्या घोषणेची खिल्ली उडवली, असे शेरगील यांनी म्हटले आहे.
The kind of language used against industry captains&calling their work against nation’s interest is shameful to the core&he is India’s Commerce Minister!
— Priyanka Chaturvedi🇮🇳 (@priyankac19) August 14, 2021
CII should demand an apology instead of helping him by pulling down the video. Stand up to bullying! https://t.co/dPblCaBrmG
एकीकडे केंद्र सरकारने टाटा उद्योग समुहाला देशाच्या नवीन संसद भवनाच्या उभारणीचं काम दिलं आहे. तर, दुसरीकडे पियुष गोयल यांनी (माध्यमांच्या वृत्तानुसार) देशद्रोही चेहरा असल्याचे म्हटलंय. भाजपच्या दुटप्पी भूमिकेला मर्यादाच नाही, अशा शब्दात शेरगील यांनी पियुष गोयल आणि भाजपावर टीका केली आहे. दरम्यान, शिवसेना प्रवक्त्या आणि खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनीही गोयल यांच्यावर बाण सोडले आहेत. ज्या पद्धतीने देशातील उद्योजकांबद्दल भाषेचा वापर केला, त्यांना देशहितविरोधी म्हटले, हे लाजीरवाणे असल्याचं चतुर्वेदी यांनी म्हटलं आहे.