Join us  

अदानींना पुन्हा झटका! ५५ हजार कोटी बुडाले, दोन दिवसात पुन्हा 'टॉप-२०' बाहेर

By ऑनलाइन लोकमत | Published: February 10, 2023 11:06 AM

उद्योगपती गौतम अदानी आणि त्यांच्या समूहासाठी या आठवड्याचे पहिले तीन दिवस दिलासादायक ठरलेले असताना आज पुन्हा एकदा धक्का बसला आहे.

उद्योगपती गौतम अदानी आणि त्यांच्या समूहासाठी या आठवड्याचे पहिले तीन दिवस दिलासादायक ठरलेले असताना आज पुन्हा एकदा धक्का बसला आहे. इंडेक्स प्रोव्हायडर एमएससीआयने अदानी ग्रुपच्या चार कंपन्यांच्या वेटिंगमध्ये कपात करण्याची घोषणा केली आहे. त्यानंतर कंपन्यांच्या शेअर्समध्ये पुन्हा घसरण पाहायला मिळत आहे. गौतम अदानी यांची एकूण संपत्ती आता ५५ हजार कोटी रुपयांनी म्हणजे १० टक्क्यांहून अधिक घसरली आहे आणि दोन दिवसांत ते श्रीमंतांच्या यादीतून पुन्हा एकदा 'टॉप २०' मधून बाहेर फेकले गेले आहेत.

एमएससीआयच्या माहितीनुसार अदानी ग्रुपच्या चार कंपन्यांच्या वेटिंगमध्ये घसरण आली आहे, ज्यात प्रमुख कंपनी अदानी एंटरप्रायझेसचा समावेश आहे. अमेरिकन शॉर्ट सेलर हिंडेनबर्ग रिसर्चच्या २४ जानेवारीच्या अहवालानंतर अदानी समूहावर स्टॉक मॅनिप्युलेशनचा आरोप करण्यात आला आहे. अदानी समूहाने कोणताही गैरकारभार झाला नसल्याचा दावा केला आहे. अहवालानुसार, अदानी एंटरप्रायझेस व्यतिरिक्त, एमएससीआय अदानी टोटल गॅसचे वेटेज कमी करण्याचा विचार करत आहे.

सिमेंट कंपनी ACC Ltd चे वेटेज देखील कमी केले जाईल. या प्रकरणी अदानी समूहाकडून कोणतेही स्पष्टीकरण आलेलं नाही. ३० जानेवारीपर्यंत, MSCI इमर्जिंग मार्केट्स इंडेक्समध्ये चार कंपन्यांचे एकत्रित वेटेज ०.४ टक्के होते. हे बदल १ मार्चपासून लागू होतील. हिंडेनबर्ग अहवालाने अब्जाधीश गौतम अदानी यांच्या नेतृत्वाखालील समूह धोक्यात आणला आहे आणि समूहाच्या शीर्ष सात लिस्टेड कंपन्यांच्या मार्केट कॅपमधील जवळपास ११० अब्ज डॉलर बुडाले आहेत.

अदानींचे ५५ हजार कोटी बुडालेया घसरणीमुळे गौतम अदानी यांच्या नेटवर्थलाही मोठा फटका बसला आहे. फोर्ब्स रिअल टाईम अब्जाधीशांच्या मते, गौतम अदानी यांच्या संपत्तीत १० टक्क्यांहून अधिक म्हणजे ६.६ अब्ज डॉलर्सची (सुमारे ५५,००० कोटी रुपये) घट झाली आहे. फोर्ब्सच्या मते, सध्या गौतम अदानी यांची संपत्ती ५८.४ अब्ज डॉलर आहे. गौतम अदानी यांची एकूण संपत्ती एका दिवसापूर्वी ६० बिलियन डॉलरपेक्षा जास्त झाली होती.

टॅग्स :गौतम अदानी