Join us  

HDFC बँकेच्या ग्राहकांना झटका; जास्त भरावा लागणार EMI, गृहकर्ज महागले

By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2022 6:00 PM

HDFC : याचा परिणाम नवीन आणि विद्यमान ग्राहकांवर होणार आहे. दोघांसाठी कर्जाचा ईएमआय वाढेल आणि त्याचा त्यांच्या मासिक बजेटवर परिणाम होईल. 

 नवी दिल्ली : देशातील सर्वात मोठी हाऊसिंग डेव्हलपमेंट अँड फायनान्स कॉर्पोरेशनने (HDFC) गृहकर्जाच्या व्याजदरात वाढ करून ग्राहकांना झटका दिला आहे. एचडीएफसीने शनिवारी रिटेल प्राइम लेंडिंग रेट (RPLR) वाढवला आहे. RPLR हा बेंचमार्क लेंडिंग रेट आहे. याला तुम्ही किमान व्याजदर देखील म्हणू शकता.  HDFC ने  यामध्ये 0.25 टक्क्यांनी वाढ केली आहे. हे वाढलेले दर 1 ऑगस्टपासून लागू होतील. याचा परिणाम नवीन आणि विद्यमान ग्राहकांवर होणार आहे. दोघांसाठी कर्जाचा ईएमआय वाढेल आणि त्याचा त्यांच्या मासिक बजेटवर परिणाम होईल. 

HDFC ने  शनिवारी शेअर बाजाराला व्याजदरात वाढ झाल्याची माहिती दिली. HDFC ने घरांच्या कर्जावरील रिटेल प्राइम लेंडिंग रेटमध्ये वाढ केली आहे. हा असा दर आहे, ज्यावर अॅडजस्टेबल रेट होम लोन्स (ARHL) बेंचमार्क केले जातात. 25 बेसिस पॉइंट्स म्हणजेच 0.25 टक्क्यांनी दर वाढवण्यात आला आहे. नवीन दर 1 ऑगस्ट 2022 पासून लागू होतील, असे HDFC कडून सांगण्यात आले आहे. 

3 महिन्यांत 5 वेळा महाग झाले HDFC होम लोन याआधी HDFC ने 9 जून रोजी RPLR मध्ये 50 बेस पॉइंट्स किंवा 0.50 टक्के वाढ केली होती. 1 जून रोजी 0.5 टक्क्यांनी वाढ करण्यात आली होती. 2 मे रोजी व्याजदरात 5 बेसिस पॉइंट्सने वाढ करण्यात आली आणि 9 मे रोजी होम लोनच्या दरात 0.30 टक्क्यांनी वाढ करण्यात आली होती. HDFC रिटेल प्राइम लेंडिंग रेटमध्ये या नवीन वाढीमुळे, कर्जदारांसाठी गृहकर्ज अधिक महाग होतील आणि त्यांना ईएमआयसाठी जास्त रक्कम खर्च करावी लागेल.

RBI वाढवू शकते व्याजदर आरबीआयच्या चलनविषयक धोरण समितीच्या (एमपीसी) बैठकीच्या काही दिवसांपूर्वी एचडीएफसीने व्याजदरात ही वाढ केली आहे. आरबीआयच्या या MPC बैठकीत महागाई रोखण्यासाठी रेपो दरात वाढ करणे अपेक्षित आहे. पुढील आठवड्यात ही बैठक होणार आहे. पुढील बैठकीत रेपो दर 0.35 वरून 0.50 टक्क्यांपर्यंत वाढवला जाऊ शकतो. विशेष म्हणजे, चलनवाढीवर नियंत्रण ठेवण्यासाठी चलनविषयक धोरण समितीने मे आणि जूनमध्ये सलग दोन टप्प्यांत रेपो दरात 0.90% वाढ केली होती. त्यामुळे रेपो दर 4.90% वर गेला आहे. यानंतर बँका आणि इतर कर्ज देणाऱ्या संस्था सातत्याने कर्ज महाग करत आहेत. मात्र, त्यामुळे एफडीचे व्याजदर वाढत आहेत.

टॅग्स :एचडीएफसीपैसाव्यवसायबँक