पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्त्वपूर्ण योजनांपैकी एक असलेल्या पंतप्रधान जनधन योजनेंतर्गत देशभरात ५१ कोटींहून अधिक जनधन बँक खाती उघडण्यात आली आहेत. या जनधन बँक अकाऊंटबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे. या जनधन बँक अकाऊंटपैकी १० कोटींहून अधिक बँक खाती ही इनॉपरेटिव्ह असल्याची माहिती समोर आली आहे. या इनॉपरेटिव्ह बँक खात्यांमधील मधील पाच कोटींहून अधिक बँक खाती ही महिलांच्या नावावर आहेत. या इनॉपरेटिव्ह खात्यांमध्ये लोकांचे एकूण १२ हजार ७७९ कोटी रुपये जमा झालेले आहेत.
केंद्रीय वित्तराज्यमंत्री भागवत कराड यांनी काही दिवसांपूर्वी राज्यसभेमध्ये पंतप्रधान जनधन योजनेसंदर्भातील एका प्रश्नाच्या उत्तरामध्ये याची माहिती दिली होती. भागवत कराड म्हणाले की, निष्क्रिय झालेल्या जनधन खात्यांची टक्केवारी ही बँकिंग क्षेत्रातील एकूण निष्क्रीय खात्यांच्या टक्केवारी एवढीच आहे. एकूण १० कोटी ३४ लाख निष्क्रिय जनधन खात्यांपैकी ४ कोटी ९३ लाख खाती ही महिलांची आहेत. इनॉपरेटिव्ह जनधन खात्यांमध्ये एकूण ठेवींपैकी ६.१२ टक्के ठेवी आहेत.
भागवत कराड यांनी सांगतले की, खाती इनॉपरेटिव्ह होण्याची अनेक कारण आहे. याचा बँक अकाऊंट होल्डर्सशी कुठलाही थेट संबंध नाही आहे. अनेक महिन्यांपासून या खात्यांमधून व्यवहार न झाल्याने ही खाती बंद झाली असावीत. रिझर्व्ह बँकेच्या सूचनेनुसार जर बँकेच्या खात्यामधून दोन वर्षांपैक्षा अधिक वेळेपर्यंत कुठलाही ग्राहकाने व्यवहार केला नसेल तर संबंधिक बचत किंवा चालू खाते हे निष्क्रिय समजले जाते. कराड यांनी सांगितले की, बँक निष्क्रिय खात्यांची टक्केवारी कमी करण्यासाठी प्रयत्न करत आहे. तसेच सरकारकडून नियमितपणे लक्षही ठेवलं जात आहे.
कराड यांनी आणखी माहिती देताना सांगितले की, ही खाती सध्या इनॉपरेटिव्ह झाली असली तरी सक्रिय खात्यांप्रमाणेच या खात्यांवरही व्याज मिळत राहील. तसेच ही खाती पुन्हा सुरू करून त्यामधील पैसे काढता येतील.