नवी दिल्ली : इन्स्टंट मेसेजिंग ॲप व्हॉट्सॲपचे भारत प्रमुख अभिजित बोस यांनी मंगळवारी अचानक आपल्या पदाचा राजीनामा दिला. अभिजितसोबतच मेटा इंडियाचे सार्वजनिक धोरण संचालक राजीव अग्रवाल यांनीही आपल्या पदाचा राजीनामा दिला. अभिजित बोस यांच्या जागी आतापर्यंत कोणाचीही नियुक्ती करण्यात आलेली नाही, मात्र ती लवकरच होणे अपेक्षित आहे. मेटाने आपल्या कंपनीतील कर्मचारी कपातीची घोषणा केल्यानंतर एका आठवड्यात जगभरातील सुमारे ११,००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले आहे. ही कंपनीची आतापर्यंतची सर्वात मोठी कपात होती. या महिन्याच्या सुरुवातीला भारतातील मेटाप्रमुख अजित मोहन यांनीही आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. ते मेटाच्या प्रतिस्पर्धी स्नॅपचॅटमध्ये रुजू झालेत. त्यामुळे मेटामध्ये राजीनामासत्र सुरू झाल्याची चर्चा रंगली आहे.
माजी टीव्ही पत्रकाराकडे जबाबदारीशिवनाथ ठकराल, ज्यांना भारतातील सर्व मेटा ब्रँडचे सार्वजनिक धोरण संचालक म्हणून नियुक्त करण्यात आले आहे, ते माजी टीव्ही पत्रकार आहेत. ते २०१७ पासून व्हॉट्सॲपच्या सार्वजनिक धोरण टीमशी संबंधित आहेत. शिवनाथ ठकराल हे मेटा – फेसबुक, इन्स्टाग्राम आणि व्हॉट्सॲपच्या सर्व ॲप ॲप्सच्या धोरण विकास उपक्रमाचे नेतृत्व करतील. व्हॉट्सॲपचे भारतात ५६३ दशलक्ष वापरकर्ते आहेत.कंपनीने काय म्हटले?अभिजित बोस यांच्या राजीनाम्यानंतर जारी केलेल्या निवेदनात, व्हॉट्सॲपचे प्रमुख विल कॅथकार्ट म्हणाले, “व्हॉट्सॲपचे पहिले भारत प्रमुख म्हणून अभिजित बोस यांच्या अतुलनीय योगदानाबद्दल मी त्यांचे आभार मानतो. त्यांनी आमच्या टीमला नावीन्यपूर्ण सेवा प्रदान करण्यात मदत केली ज्याचा लाखो लोकांना आणि व्यवसायांना फायदा झाला.‘‘