Consumer Protection Act : 'एकदा विकलेला माल परत घेणार नाही' अशा आशयाच्या पाट्या तुम्हीही अनेक दुकानांमध्ये पाहिल्या असतील. अशा दुकानांमधून खरेदी केलेली वस्तू खराब निघाली तर अंगावर पडते. कारण, दुकानदाराने आधीच स्पष्ट केले आहे. पण, अशी पाटी लिहिणे म्हणजे दुकानदाराची मनमानी आहे, असं सांगितले तर तुमचा विश्वास बसेल का? ग्राहक संरक्षण कायद्यानुसार दुकानदार विकलेला माल परत घेण्यास नकार देऊ शकत नाही. त्यामुळे यापुढे कुठल्याही दुकानदाराने विकलेला माल परत घेण्यास नकार दिला तर त्याला कायद्याच्या भाषेत समजवा.
गुजरात सरकारने आता यासंदर्भात एक परिपत्रक जारी केले आहे. परिपत्रकानुसार, ग्राहकाला कोणतीही वस्तू ज्या स्वरूपात दुकानातून किंवा मॉलमधून खरेदी केली होती. त्याच स्वरूपात परत करण्याचा अधिकार आहे. दुकानदार किवा मॉल व्यवस्थापन ते परत घेण्यास बांधील आहेत.
देशातील अनेक ग्राहक न्यायालयांनीही यासंदर्भात वेळोवेळी महत्त्वाचे निर्णय दिले आहेत. ग्राहक कायद्यानुसार दुकानदाराने विकलेला माल परत घेण्यास नकार दिल्यास ग्राहक न्याय मागू शकतो. यामध्ये दोषी आढळल्यास दुकानदाराला दंड आणि शिक्षेला सामोरे जावे लागू शकते. ग्राहक व्यवहार विभागाने १९९९ मध्ये विकलेला माल परत घेणार नाही, अशा पाट्या छापण्यावरही बंदी घातली आहे.
वस्तू घेतलेल्या स्वरुपात करण्याचा अधिकारकोणताही दुकानदार किंवा मॉल प्रशासन सदोष वस्तू किंवा उत्पादने परत घेण्यास नकार देऊ शकत नाही. तुम्हाला सदोष वस्तू परत करण्याचा अधिकार आहे. जर एखादी वस्तू ग्राहकाच्या गरजेशी जुळत नसेल, तर ग्राहकाला ती आहे तशी परत करण्याचा अधिकार आहे. दुकानदाराने वस्तू परत घेण्यास नकार दिल्यास आपण त्याच्याबद्दल तक्रार करू शकतो.
अशा दुकानदाराची तक्रार तुम्ही ग्राहक मंचात करू शकता. ग्राहक संरक्षण कायद्यांतर्गत एखादी वस्तू सदोष असल्यास ती १५ दिवसांच्या आत परत करता येईल, असे म्हटले आहे. ग्राहकाला परतावा मागण्याचा किंवा सदोष वस्तू बदलण्याची मागणी करण्याचा पूर्ण अधिकार आहे.
कुठे करावी तक्रार?दुकानदाराने माल परत न घेतल्यास ग्राहक जिल्हा ग्राहक मंच, राज्य ग्राहक आयोग किंवा राष्ट्रीय ग्राहक आयोगाकडे तक्रार करू शकतो. तसेच, ग्राहक व्यवहार मंत्रालयाच्या वेबसाइटवर किंवा ग्राहक हेल्पलाइनवर ऑनलाइन तक्रार नोंदवता येते. ग्राहक त्यांच्या तक्रारी हेल्पलाइन क्रमांक १८००-११-४००० वर नोंदवू शकतात.