Join us  

ऑनलाइन ‘सेल’मध्ये खरेदी करताय? पण आधी इकडे लक्ष द्या 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2022 10:19 AM

वस्तू खरेदी करण्याची पद्धत बदलली तरी खरेदी करण्यामागची मानसिकता बदलत नाही. ‘महाबचत ऑफर’  किंवा ‘सेल’ या शब्दांची भुरळ पडतेच; पण....

वस्तू खरेदी करण्याची पद्धत बदलली तरी खरेदी करण्यामागची मानसिकता बदलत नाही. ‘महाबचत ऑफर’  किंवा ‘सेल’ या शब्दांची भुरळ पडतेच; पण  ऑनलाइन खरेदी करताना आवश्यक खबरदारी घेतली नाही तर ‘आपण फसवले गेलो’ ही भावना जास्त त्रासदायक असते.  ऑनलाइन खरेदीच्या महाबचत सेलच्या धमाक्यात भान विसरून शिरण्याआधी हॅकर्सचे हल्ले आणि ऑनलाइन फसवणूक होण्यापासून वाचण्यासाठी काही महत्त्वाच्या गोष्टींची काळजी घ्यायला हवी.

१. एखाद्या अनोळखी वेबसाइटवर कितीही मोठी ऑफर दिसली म्हणून त्याच्या मागे लगेच जाऊ नये. ही आपली नेहमीची, विश्वासार्ह वेबसाइट आहे का तपासा. 

२. ऑनलाइन शाॅपिंग करताना वेंधळेपणा न करता जागरुकपणे, समजून उमजून लिंक क्लिक करणं अपेक्षित आहे. विश्वासार्ह साइटशी मिळती जुळती एखादी लिंक समोर येऊ शकते. अशा वेळेस वेबसाइटचं स्पेलिंग काय आहे, याकडे लक्ष देण्याची दक्षता घ्यावी. आपल्या ई-मेलवर वस्तूंच्या/ सेलच्या जाहिराती करणाऱ्या अनोळखी ई-मेल्स आलेल्या असतात. अशा वेळी एम्बेड लिंकवर क्लिक न करता गुगलवर जाऊन ती साइट शोधावी.

३. ऑनलाइन शाॅपिंग करताना ऑफर या केवळ ‘आकर्षक’ असून चालत नाही, तर त्या खऱ्या आणि विश्वसनीय असायला हव्यात. अविश्वसनीय दावा करणाऱ्या ऑफर मागे जाऊ नये. उदा. कोणत्याही मोठ्या ब्रँडवर ८० टक्के सवलत असणं केवळ अविश्वसनीय.

४. ऑनलाइन खरेदी करताना वेबसाइटला ‘पॅडलाॅक’ आहे की नाही, याची आधी खात्री करावी. ज्या वेबसाइटला एसएसएल (SSL) म्हणजेच सिक्युअर साॅकेट लेअर नसेल तिथून खरेदी करणं टाळावं. वेबसाइटला सिक्युअर साॅकेट लेअर आहे की नाही, हे बघण्यासाठी एचटीटीपीएस मधला ‘S’ महत्वाचा. केवळ http असेल तर ती वेबसाइट विश्वसनीय नाही. https असलेल्या वेबसाइटला क्लिक केल्यावर यूआरएलच्या डाव्या बाजूला पॅडलाॅक दिसतं किंवा त्याखालील स्टेटस बारमध्ये पॅडलाॅक दिसतं. पॅडलाॅक नसलेली वेबसाइट ऑनलाइन खरेदीसाठी योग्य नाही, हे समजावं.

५. आपण ऑनलाइन खरेदीसंदर्भात कोणतीही कृती केलेली नसताना ‘पासवर्ड रिसेट करा’ या आशयाच्या ई-मेलपासून सावध राहावं.

टॅग्स :खरेदी