लंडन : युरोपीय संघामधून ब्रिटन बाहेर पडल्यास लंडनचे जागतिक वित्तीय केंद्र म्हणून असलेले महत्त्व कमी होईल, असा इशारा आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने दिला आहे. युरोपीय संघातून बाहेर पडण्याची तयारी ब्रिटनने चालविली आहे. त्यासाठी २३ जून रोजी ब्रिटनमध्ये सार्वमत घेतले जाणार आहे. सार्वमताचा निर्णय युरोपीय संघातून बाहेर पडण्याच्या बाजूने गेल्यास जागतिक पातळीवर मोठे हादरे बसू शकतात. युरोपीय संघाला याचा फटका बसेलच; पण ब्रिटनलाही त्याची झळ सोसावी लागेल, असे या क्षेत्रातील जाणकारांचे मत आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने याच अनुषंगाने ब्रिटनला सावध केले आहे. नाणेनिधीने म्हटले की, युरोपीय संघातून बाहेर पडल्यास ब्रिटनला पासपोर्ट अधिकार गमवावा लागेल. या अधिकारान्वये युरोपीय संघाच्या सदस्य देशांत कोठेही काम करण्याची परवानगी मिळते. युरोपीय संघात २८ सदस्य आहेत. प्रत्येक सदस्य देशात काम करण्यासाठी वेगळी परवानगी घेण्याची गरज पासपोर्ट अधिकारामुळे राहत नाही. ब्रिटन युरोपीय संघातून बाहेर पडल्यास हा अधिकार तो गमावील. त्यामुळे ब्रिटिश नागरिकांच्या युरोपात नोकऱ्या करण्याच्या संधी मर्यादित होतील. २८ देशांपैकी कुठेही नोकरी करायची असल्यास तशी परवानगी त्या देशाकडून घ्यावी लागेल.
युरोपीय संघातून बाहेर पडल्यास फटका
By admin | Published: May 14, 2016 2:14 AM