लहान मुलांना पॉकेट मनी द्यावा का? किती? केव्हा?... याचं ठामठोक उत्तर सांगता येणार नाही. कारण मुलांच्या हाती ‘आयता’ पैसा देण्याचे फायदे आणि तोटे दोन्हीही संभवू शकतात. पण तज्ज्ञांचं म्हणणं आहे, मुलांना ‘योग्य’ पॉकेटमनी दिला गेला आणि तो कसा वापरायचा, याचं थोडंसं प्रशिक्षण मिळालं, तर मोठेपणी पैशांबाबत चुकीचे निर्णय घेण्याची शक्यता कमी होऊ शकते.
मुलांना किती पॉकेटमनी द्यावा? - या प्रश्नाचं एका शब्दात उत्तर आहे, ते म्हणजे ‘योग्य’! दर आठवड्याला हे पैसे मिळणार असतील, तर ते आठवडाभर पुरवायचे आहेत, याची जाणीव मुलांना असली पाहिजे. ‘पॉकेटमनी’च्या माध्यमातून मुलांना बचतीची सवय लागली पाहिजे. आपल्याला एखादी गोष्ट हवी असेल, तर ती लगेच मिळणार नाही, आपल्याला आणखी बचत करावी लागेल, आहेत ते पैसे सांभाळावे लागतील आणि त्यानंतरच आपल्याला ती वस्तू घेता येईल, ही जाणीव मुलाच्या मनात निर्माण झाली पाहिजे.
कोणत्या वयात पॉकेटमनी सुरू करावा? तुम्ही मुलाला अगदी सहाव्या वर्षापासूनही पॉकेटमनी देऊ शकता. कारण या वयापर्यंत त्याला जबाबदारीची जाणीव झालेली असते. शाळेची वह्या, पुस्तकं यासाठी मात्र पॉकेटमनी नसावा. या गोष्टी पालकांनीच मुलाला घेऊन द्यायच्या आहेत. मात्र, त्यानं पुस्तक हरवलं, तर त्यासाठी त्याला पॉकेटमनीचा उपयोग करायला सांगता येईल.
पैशाचं व्यवस्थापन कसं करावं? पॉकेटमनीमुळे मुलांना पैशाचं व्यवस्थापन कसं करावं हे कळेल. एखादा निर्णय चुकला तरी ‘तुमच्या सुरक्षित हाताखाली’ त्याची चूक त्याला कळेल, चुकीची ‘संधी’ मिळेल, कारण हे नुकसान किरकोळ असलं, तरी त्यापासून ‘शिकलेला’ धडा मात्र मोठा असेल.
मुलांना ‘बक्षिसी’ द्यावी का? आपला पॉकेटमनी वाढवण्यासाठी मुलांना उत्तेजन द्यायला हवं. मात्र, घरातल्या कामांसाठी अतिरिक्त ‘बक्षीस’ देऊ नये. समजा, त्यानं स्वत:चा बेड आवरला, आपले कपडे नीट रचून ठेवले, तर त्यासाठी बक्षीस देऊ नका. पण समजा, त्यानं तुमचं संपूर्ण कपाट आवरुन ठेवलं, त्यासाठी त्याला स्वत:चा वेळ आणि श्रम दोन्ही मोजावे लागले, तर थोडीशी रक्कम तुम्ही त्याला बक्षीस म्हणून देऊ शकता. आपलं आपल्याला ‘कमवावं’ लागेल, जगात काहीही ‘फुकट’ मिळत नाही, ही शिकवण मुलाला त्यामुळे नकळतपणे मिळेल.