मी ३१ वर्षांचा आहे. मला दोन वर्षांचा मुलगा आहे, आम्हाला दुसरं मूल हवं आहे, पण त्यासाठी अजून चार वर्षे वेळ आहे. आता माझी बायकोही नोकरी करते, पण चारेक वर्षांनी करेलच असं नाही, कदाचित दुसरं मूल झालं की ती काही काळ ब्रेक घेईल. मी २८ वर्षांचा असताना एक कोटी रुपयांची इन्श्युरन्स पॉलिसी घेतली होती. आता मला वाटतं की, अजून २ कोटी रुपयांची पॉलिसी काढावी. साधारण वय ५५ किंवा ६५ वर्षे होईल तोपर्यंत असावं लिमिट, काय करू, घेऊ का?
- असे किंवा या प्रकारचे प्रश्न मला नेहमी विचारले जातात. एवढ्या त्रोटक माहितीवर ठोस उत्तर देणं अवघड होतं. पण तरीही... वयाच्या पस्तिशीत या व्यक्तीला दुसरं मूल होईल. म्हणजे त्यानं तेव्हा २४ वर्षांसाठीची पॉलिसी घेतली तर तेव्हा त्याचं दुसरं मूल जेमतेम २० वर्षांचं असेल. म्हणजे त्याचं शिक्षणही बाकी असेल, मात्र त्यानं ६५ वर्षे वयापर्यंतची पॉलिसी घेतली तर तोवर मुलगाही शिकून पायावर उभं राहण्याच्या वयाचा झालेला असेल, शिक्षण खर्च संपलेला असेल आणि या व्यक्तीला खऱ्या अर्थानं निवृत्तीनंतरचं आयुष्य जगता येईल.आता तरुण मुलं योग्य वयात या साऱ्याचा विचार करून नियोजन करतात. मात्र, ते नियोजन करताना काही गोष्टी आणखी लक्षात घ्यायला हव्यात आणि त्याप्रमाणे नियोजन करायला हवे.
१. विमा पॉलिसीची रक्कम कशी ठरवावी? मुलांचं शिक्षण, त्यासाठीचा खर्च, महागाईचा दर, घर, घरासाठीचं कर्ज, दोघे कमावते की एकटेच कमावणार याचा विचार पहिला. सगळं सुरळीत झालं तर विम्याचे पैसे कोणत्या टप्प्यावर मिळतील, त्या टप्प्यात तुमच्या जबाबदाऱ्या काय असतील, त्या वाढलेल्या असतील का, तेव्हा आपल्या हातात येणारे पैसे पुरेसे असतील का? याचा विचार दुसरा.. दुर्दैवानं तुम्हाला काही झालंच तर जोडीदाराला तेवढे पैसे, राहतं घर मिळेल, पण त्यात त्याचं भागेल का? याचाही विमा उतरवताना विचार करावा.
२. वयाच्या ५५ वर्षे वयापर्यंतची पॉलिसी घेतली, तर तोवर आपल्या आयुष्यातला ‘कमावलंच पाहिजे’ हा टप्पा संपलेला असेल की कमवावंच लागेल या टप्प्यात आपण असू याचा विचार करा. अन्य सर्व उत्पन्नाचा विचार करता कमावण्याच्या सक्तीतून बाहेर पडलेले असाल, तर त्या वयापर्यंतची पॉलिसी घ्यायला हरकत नाही. त्यामुळे जितक्या कमी वयात आपण विमा उतरवू तितकं चांगलं. पुढे तुम्हाला काही आजार झाले, तर टर्म लाइफ इन्श्युरन्स मिळणं अवघड होतं. त्यामुळे शक्य तेवढ्या कमी वयात मोठ्या रकमेचा विमा विचार करून उतरवलेला बरा.