Gold or Gold ETF : धनत्रयोदशीला सोनं खरेदी करणं शुभ मानलं जातं. धनत्रयोदशीच्या शुभ मुहूर्तावर अनेक जण आपापल्या परिनं सोन्याचे दागिने, नाणी इत्यादी खरेदी करतात. यावेळी सोन्या-चांदीच्या दरात विक्रमी वाढ झाली आहे. सोन्याचा भाव ८० हजार रुपये प्रति १० ग्रॅमच्या पुढे गेलाय, तर चांदीही लाखाच्या पुढे गेलीये. त्यामुळे गुंतवणुकीसाठी धनत्रयोदशीला सोनं खरेदी करण्याचा विचार करत असाल तर सोन्याचे दागिने खरेदी करावेत की गोल्ड ईटीएफमध्ये (एक्स्चेंज ट्रेडेड फंड) गुंतवणूक करावी असा प्रश्न तुम्हाला पडू शकतो.
गोल्ड ईटीएफ गुंतवणूकदारांना सोनं किंवा सोन्याशी संबंधित असेट क्लासमध्ये गुंतवणूक करण्याची सुविधा देतो, ज्यांचा शेअर बाजारात व्यवहार होतो. चला तर मग जाणून घेऊया या दोघांपैकी कोणत्या गोष्टीत गुंतवणूक करणं तुमच्यासाठी अधिक फायदेशीर ठरू शकतं.
कशात मिळालं अधिक रिटर्न?
गेल्या वर्षभरात सोन्याच्या दरात विक्रमी वाढ झाली आहे. २१ ऑक्टोबर २०२३ रोजी सोन्याचा भाव ६१,६९० रुपये प्रति १० ग्रॅम होता, जो २१ ऑक्टोबर २०२४ रोजी ८०,४२० रुपये प्रति १० ग्रॅम झाला आहे. म्हणजेच किंमतीत विक्रमी १८,७३० रुपयांची वाढ झाली आहे. ही टक्केवारी तब्बल ३०.३ टक्के इतकी आहे. गेल्या तीन वर्षांत सोन्याच्या दरात जवळपास ३२,८५० रुपयांची वाढ झाली. अशा प्रकारे सोन्यानं गेल्या तीन वर्षांत जवळपास ६८.९ टक्के परतावा दिला आहे. तर पाच वर्षांत सोन्याने १०८.९ टक्के बंपर परतावा दिलाय.
आता गोल्ड ईटीएफ योजनेवर नजर टाकली तर एका वर्षात सरासरी परतावा २९.१२ टक्के झाला आहे. तर ३ वर्ष आणि ५ वर्षात परतावा अनुक्रमे १६.९३% आणि १३.५९% झाला आहे. अशा प्रकारे फिजिकल सोन्यापेक्षा हा परतावा कमी असतो. कमॉडिटी तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, जर तुम्ही दीर्घकाळ सोन्यात गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर फिजिकल गोल्ड खरेदी करणं फायद्याचं ठरेल. तर, लिक्विडिटी हवी असेल तर गोल्ड ईटीएफ हा चांगला पर्याय असेल.
दागिन्यांपेक्षा गोल्ड ईटीएफ विकणे सोपे
मॅन्युफॅक्चरिंग आणि स्टोरेज कॉस्टमुळे फिजिकल गोल्डला सहसा जास्त किंमत मोजावी लागते. दुसरीकडे, गोल्ड ईटीएफ मिळविण्याचा खर्च कमी असतो. गोल्ड ईटीएफशी संबंधित खर्चांपैकी एक म्हणजे ब्रोकरेज चार्जेस, जे खरेदी-विक्री करताना भरावे लागतात. गोल्ड ईटीएफचा आणखी एक फायदा म्हणजे सोन्याचे दागिने किंवा नाणी विकायला जास्त वेळ लागू शकतो, पण गोल्ड ईटीएफची शेअर बाजारात पटकन खरेदी-विक्री करता येते. जर तुम्ही ट्रेडिंगसाठी सोन्यात गुंतवणूक करत असाल तर तुम्ही गोल्ड ईटीएफचा पर्याय निवडू शकता.
(टीप : यामध्ये सामान्य माहिती देण्यात आलेली आहे. शेअर बाजारातील गुंतवणूक जोखमीच्या अधीन आहे. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील तज्ज्ञांचा किंवा जाणकारांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)