समीर परांजपे(मुख्य उपसंपादक)
मुद्द्याची गोष्ट : आपल्या कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी आठवडाभरात 90 तास काम करावे, अशी अवास्तव अपेक्षा लार्सन अँड टुब्रोचे अध्यक्ष एन. सुब्रमण्यन यांनी व्यक्त केली. त्यावरून जे रान उठले आहे ते बघू जाता भारतीयांनी स्माट काम करावे की राब राब राबावे, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
तुम्ही घरी बसून काय करता? किती वेळ तुम्ही तुमच्या बायकोकडे पाहू शकता? बायका किती वेळ पतीकडे पाहू शकतात? ऑफिसमध्ये या आणि काम करा, असे वादग्रस्त उद्गार एल अँड टी या कंपनीचे अध्यक्ष एस. एन. सुब्रमण्यन यांनी नुकतेच काढले. आपल्या कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी आठवडाभरात ९० तास काम करावे, अशी बेकायदेशीर अपेक्षा या गृहस्थांनी व्यक्त केली. प्रचलित कायद्याप्रमाणे दर आठवड्याला कोणत्याही कर्मचाऱ्याने दररोज ८ तास याप्रमाणे ६ दिवस ४८ तास काम करावे व त्याला एक साप्ताहिक सुट्टी असावी, अशी तरतूद आहे. ते माहीत असूनही सुब्रमण्यमन यांनी काढलेले उद्गार हे महिला व पुरुषांच्या कर्तबगारीचा अपमानच नव्हे काय?
एखादा कर्मचारी दररोजची आठ तासांची पाळी करून घरी परतला की दिवसभराच्या शारीरिक श्रमामुळे त्याला विश्रांती घेणे आवश्यक असते. बायको, मुले, नातेवाईक यांच्या संगतीत दिवसाचा उरलेला वेळ आनंदात घालवल्यावर त्याच्या मनाला बरे वाटते. दररोजची ८ तासांची झोप ही त्याला पुन्हा दुसऱ्या दिवशी श्रम करण्यासाठी ऊर्जा मिळवून देते. याचा काहीही विचार न करता सुब्रमण्यन यांनी जिभेचा पट्टा चालविला आहे. आजच्या आधुनिक काळात महिलांना आपल्या नवऱ्याचे तोंड बघत बसण्याशिवाय दुसरा उद्योग नसतो असे या महाशयांना सुचवायचे आहे का? पुरुषही आपल्या बायकोचे तोंड किती वेळ बघणार या उद्गारातून सुब्रमण्यन यांनी पुरुषांसह महिलांनाही कमी लेखले असून, त्यांचा कडक निषेध नेटकऱ्यांनी केलाच आहे.
जगण्यासाठी प्रत्येकाला पोटापाण्याचा व्यवसाय हा करावाच लागतो. पण दर आठवड्याला असलेले आपले कामाचे तास व घरात, संसारात द्यावयाचा वेळ यांचा समतोल बिघडला तर अनेकांचे संसार टिकणार नाहीत. त्यामुळे अनेक तास नवरा व बायकोला एकमेकांचे तोंड पाहण्याची वेळच येणार नाही. इतके सामाजिक भान सुब्रमण्यन यांना असायला हवे होते. मुळात एखादा कर्मचारी दर आठवड्याला किती काम करतो यावर खरंच त्या देशाची प्रगती सर्वस्वी अवलंबून असते का? तर अजिबात नाही. अमेरिकेत दर आठवड्याला लोक ३८ तास काम करतात आणि हेच प्रमाण भारतामध्ये ४६.७ तास आहे. अमेरिकेमध्ये लोकसंख्या आटोक्यात असून तिथे बहुतांश क्षेत्रात विलक्षण प्रगती झाली असून त्यामुळे समृद्धी निर्माण झाली आहे. तिथे विशुद्ध भांडवलदारी व्यवस्था असूनही कामगारांच्या कल्याणाबाबत कमाल काळजी घेतली जाते. अर्थात याला अपवाद म्हणून काही उदाहरणे त्या देशातही नक्कीच सापडतील.
अधिक राबणाऱ्या या देशात काय?चीनमध्ये कम्युनिस्ट राजवट असून तिथे कर्मचाऱ्यांना सरकारच्या कलानेच वागावे लागते. चीनचे कर्मचारी दर आठवड्याला ४६.१ तास काम करतात ही कागदावरची आकडेवारी आहे. तिथे कामगारांच्या सुरक्षा तसेच कल्याणाकडे म्हणावे तितके लक्ष दिले जात नाही. त्या देशातील उद्योगांमध्ये होणाऱ्या भीषण अपघातांच्या बातम्यांवर नजर टाकली तरी ही बाब स्पष्ट होईल.चीनच्या अर्थव्यवस्थेचा डोलारा निर्यात होणाऱ्या मालावर अवलंबून आहे. ती थंडावली तर चीनची अर्थव्यवस्था डगमगायला वेळ लागणार नाही.हे सत्य एल अँड टीच्या अध्यक्षांनी सांगितले नाही. आठवडाभरात ७० तास काम करा असे सांगणाऱ्या नारायण मूर्ती यांनी किमान आपले म्हणणे सभ्य शब्दांत मांडले होते. मात्र, त्यांच्याही वक्तव्यावर वादंग झालेच.
चीनमधील स्थितीवर मात्र सोईस्कर मौनभारतात लोकशाहीच्या पायावर आपली व्यवस्था उभी आहे. आपल्या नागरिक, कर्मचाऱ्यांना पूर्ण स्वातंत्र्य आहे. चीनमध्ये अशी परिस्थती आहे का, यावर नारायण मूर्ती, सुब्रमण्यन यांनी सोयीस्कर मौन बाळगले.भांडवलदाराला कमी पैशात अधिक श्रम हवे असतात. नारायणमूर्ती आणि सुब्रमण्यन यांनी आपल्या उद्योगाचे हित जपण्यासाठी वाढीव तास काम करण्याची टूम काढली. या दोघांवर नेटकरी व कामगार क्षेत्रातील लोकांनी खरपूस टीका केली आहे.
पाश्चिमात्यांची आठवडाअखेर सुटीची संकल्पना पाश्चिमात्य देशात शनिवार, रविवार सुट्टी असते. हा वेळ तेथील कर्मचारी कुटुंबाला देतात, मित्रमंडळीबरोबर मौजमजा करतात. काही जण नुसता आराम करतात. यामुळे मनाचा, शरीराचा तजेला वाढतो, ताण कमी होतो, असे वैद्यकीय तज्ज्ञांचे मत आहे.सुब्रमण्यन यांना या गोष्टी माहीत नाहीत यावर कसा विश्वास ठेवायचा? आपल्या कंपनीतील कामगारांना उपदेश देताना त्यांनी हा अजब प्रकार केला आहे. त्याबद्दल सरकारने त्यांना जाब विचारला पाहिजे.