Join us

अयोध्येतील सोहळ्यामुळे अर्थव्यवस्थेला गती; देशात ५० हजार कोटींची उलाढाल

By ऑनलाइन लोकमत | Published: December 28, 2023 5:39 PM

श्री राम मंदिराच्या उद्घाटनदिवशी देशभरात ५०,००० कोटी रुपयांपेक्षा मोठी उलाढाल होण्याचा अंदाज आहे

अयोध्येत प्रभू श्रीरामांचे भव्य-दिव्य मंदिर उभारलं जात असून २२ जानेवारी रोजी येथे प्राणप्रतिष्ठा सोहळा होत आहे. अयोध्येत या सोहळ्याची जोरदार तयारी सुरू असून मोठ्या संख्येने रामभक्त अयोध्येत दाखल होत आहेत. देशभरातून या सोहळ्यासाठी मोठ्या संख्येने भाविक भक्त अयोध्या नगरीत येणार असून देशभरातील अनेक शहरांमध्ये या सोहळ्याचा उत्सव साजरा होत आहे. त्यामुळेच, या सोहळ्यातून कोट्यवधी रुपयांची उलाढाल होणार असल्याचा अंदाज बांधला जात आहे. 

श्री राम मंदिराच्या उद्घाटनदिवशी देशभरात ५०,००० कोटी रुपयांपेक्षा मोठी उलाढाल होण्याचा अंदाज आहे. व्यापारी संघटना असलेल्या कनफेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सच्या (CAIT) अंदाजानुसार २२ जानेवारी रोजी देशभरात ५० हजार कोटी रुपयांचा व्यापार होण्याची शक्यता आहे. त्यासाठी, व्यापाऱ्यांनीही कंबर कसली असून गरजेनुसार वस्तू आणि सामानांची खरेदी-विक्री सुरू केली आहे. 

कॅटचे राष्ट्रीय नेते प्रवीण खंडेलवाल यांनी माध्यमांशी बोलताना म्हटले की, विश्व हिंदू परिषदेच्या आव्हानानुसार देशभरात १ जानेवारीपासून राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी अभियान चालवण्यात येणार आहे. त्यासाठी, देशभरातील लोकांमध्ये उत्साह दिसून येत आहे. त्यामुळेच, उद्योग, व्यापार क्षेत्रातही मोठी संधी असल्याचं बोललं जात आहे. अंदाजे, २२ जानेवारी रोजी देशभरात ५० हजार कोटी रुपयांची अतिरीक्त उलाढाल होऊ शकते. 

प्रभू श्रीराम यांच्याशी संलग्नित वस्तूंची मोठी मागणी असून श्रीराम यांची मूर्ती, प्रतिमा, श्री रामध्वज, अंगवस्त्र, रामचित्रांच्या माळा, लॉकेट, राम मंदिराची प्रतिकृती यांसह अनेक बारीक-सारीक वस्तूंना मोठी मागणी आहे. मंदिर प्रतिकृती हार्डबोर्ड, प्लायवूड किंवा लाकडापासून बनविण्यात येत आहे. त्यामुळे, त्यांनाही मोठी मागणी आहे. यातून, स्थानिक महिला व कारागिरांना मोठा रोजगार मिळाला आहे. श्रीराम यांच्या नावाने कुर्ता, टी-शर्ट आणि इतरही पोशाख बाजारात विक्रीसाठी उपलब्ध आहे. २२ जानेवारी रोजी देशभरात दिवाळी साजरी करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. त्यामुळे, मातीच्य दिव्यांनाही मोठी मागणी आली आहे.  

 

टॅग्स :राम मंदिरअयोध्याव्यवसायउत्तर प्रदेश