Join us

रियल इस्टेट क्षेत्रात गुंतवणुकीची मोठी संधी! ‘या’ कंपनीचा IPO येतोय; ६०० कोटी उभारणार

By ऑनलाइन लोकमत | Published: December 04, 2021 5:21 PM

रियल इस्टेट क्षेत्रात गुंतवणूक करण्याची सुवर्ण संधी उपलब्ध होत असून, या क्षेत्रातील नामांकित कंपनी ६०० कोटींचा आयपीओ सादर केला जात आहे.

नवी दिल्ली: गेल्या काही दिवसांपासून शेअर मार्केटमध्ये मोठे चढ-उतार होताना पाहायला मिळत आहेत. असे असले तरी अनेकविध कंपन्यांचे IPO शेअर बाजारात सादर केले जात आहेत. काही आयपीओ हीट ठरत असून, काही आयपीओंमुळे गुंतवणूकदारांची मोठी निराशा होत आहे. यातच आता रियल इस्टेट क्षेत्रात गुंतवणूक करण्याची सुवर्ण संधी उपलब्ध होत असून, या क्षेत्रातील नामांकित कंपनी ६०० कोटींचा आयपीओ सादर केला जात आहे. 

बंगळुरूस्थित श्रीराम प्रॉपर्टीजचा IPO ०८ डिसेंबर रोजी सबस्क्रिप्शनसाठी उघडणार आहे. हा आयपीओ ६०० कोटी रुपयांचा असेल. तसेच हा आयपीओ १० डिसेंबर रोजी बंद होईल. श्रीराम प्रॉपर्टीज फर्मने ऑफर फॉर सेलचा आकार ५५० कोटी रुपयांवरून ३५० कोटी रुपयांपर्यंत कमी केला आहे. आधी हा आयपीओ ८०० कोटींचा होता, पण आता तो ६०० कोटींचा होणार आहे. 

टीपीजी कॅपिटल, टाटा कॅपिटल गुंतवणूकदार

या कंपनीचे ४ विद्यमान गुंतवणूकदार टीपीजी कॅपिटल, टाटा कॅपिटल, वॉल्टन स्ट्रीट कॅपिटल आणि स्टारवुड कॅपिटल यांचा या फर्ममध्ये सुमारे ५८ टक्के हिस्सा आहे. हे सर्वजण आपापले शेअर्स विकतील. ओएफएसचा एक भाग म्हणून ओमेगा टीसी सेबर होल्डिंग्स पीटीई लिमिटेड ९०.९५ कोटी रुपयांपर्यंत समभाग विकणार आहे. टाटा कॅपिटल फायनान्शियल सर्व्हिसेस ८.३४ कोटी रुपयांचे समभाग विकणार आहे. टीपीजी एशिया एसएफ वी पीटीई लिमिटेड ९२.२० कोटी रुपयांपर्यंतचे शेअर्स विकेल. मॉरिशस इन्व्हेस्टर्स लिमिटेड १३३.५ कोटी रुपयांचे शेअर्स विकणार आहे, अशी माहिती देण्यात आली आहे. 

दरम्यान, कोरोना संकटातही रिअल इस्टेट क्षेत्रातील रिअल इस्टेट इन्व्हेस्टमेंट ट्रस्टचे दोन सार्वजनिक इश्यू यशस्वी झाले आहेत. के. रहेजा यांच्या मालकीचे माइंडस्पेस बिझनेस पार्क आरईआयटी गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये ४,५०० कोटी रुपये उभारल्यानंतर सूचीबद्ध झाले. ब्रुकफील्ड आरईआयटी या जागतिक गुंतवणूक फर्मचा ३,८०० कोटी रुपयांचा आयपीओ या वर्षी फेब्रुवारीमध्ये सूचीबद्ध झाला आहे. भारतातील सर्वांत मोठी रियल्टी फर्म मॅक्रोटेक डेव्हलपर्सने एप्रिलमध्ये आयपीओद्वारे २,५०० कोटी रुपये उभे केले आहेत. 

टॅग्स :इनिशिअल पब्लिक ऑफरिंगशेअर बाजार