नवी दिल्ली : दिवाळीचा सण तोंडावर येऊनही सोने आणि चांदीच्या भावाला काही झळाली मिळत नाही. गुरुवारी सोने १० गॅ्रममागे १८० आणि चांदी किलोमागे ३२० रुपयांनी स्वस्त झाली. या स्वस्ताईनंतर सोने २६,२५० रुपये आणि चांदी ३५,७५० रुपयांवर आली.दागिने निर्मात्यांकडून नसलेली मागणी आणि जागतिक बाजारातील अनुत्साही वातावरणामुळे सोने सलग सातव्या सत्रांत खाली आले व गुरुवारी त्याचा भाव गेल्या दोन महिन्यांतील नीचांकावर गेला. चांदीला नाणे निर्मात्यांकडून आणि औद्योगिक क्षेत्रातून मागणी नसल्यामुळे तीदेखील स्वस्त झाली. अमेरिकेची मध्यवर्ती बँक फेडरल रिझर्व्ह येत्या डिसेंबरमध्ये व्याजदर वाढविणार असल्याच्या नव्याने सुरू असलेल्या चर्चांमुळे सोन्याच्या जागतिक बाजारातील उत्साह घटला आणि त्याची मागणी कमी होऊन किमतीवर दडपण आले. किरकोळ विक्रेते आणि दागिने निर्मात्यांकडून अपेक्षित मागणी नसल्यामुळे सोने दोन महिन्यांपूर्वीच्या किमतीवर गेले. न्यूयॉर्कच्या जागतिक बाजारात बुधवारच्या व्यवहारात सोने औंसमागे ०.८७ टक्क्याने स्वस्त होऊन १,१०७.५० अमेरिकन डॉलरवर व चांदी औंसमागे १.२८ टक्क्याने खाली येऊन १५.०६ अमेरिकन डॉलरवर आली. दिल्लीतील सराफ बाजारात ९९.९ व ९९.५ टक्के शुद्धतेचे सोने १० ग्रॅममागे १८० रुपयांनी स्वस्त होऊन अनुक्रमे २६, २५० व २६,१०० रुपयांवर आले. हा भाव यापूर्वी १७ आॅगस्ट रोजी होता. गेल्या सहा दिवसांत सोने ८३५ रुपयांनी खाली आले आहे. आठ ग्रॅमचे सुवर्ण नाणे मात्र विखुरलेल्या व्यवहारांत २२,३०० रुपयांवर होते.
सराफा बाजारात शुकशुकाट
By admin | Published: November 06, 2015 1:03 AM