घर, दार, संसार सांभाळून साईड इन्कम मिळावी असे अनेक गृहिणींना वाटते. पण काय करावे, कसे करावे हे सुचत नाही किंवा कमी गुंतवणुकीत कोणता व्यवसाय सुरु करता येईल हे कळत नाही. फावलेला वेळ मोबाईल स्क्रीन स्क्रोल करण्यात वाया जातो. विचार करण्यात हेही वर्ष सरले, आता प्रत्यक्ष कृतीकडे वळूया! त्यासाठी काही सोपे, लो बजेट आणि पार्ट टाइम करता येतील अशा व्यवसायांबद्दल जाणून घेऊ. जेणेकरून सगळ्या गृहिणी कामात रमतील आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम होतील.
सोशल मीडियाची चांगली बाजू म्हणजे तुम्ही तिथे तुमच्या व्यवसायाची फुकट आणि विकत जाहिरात करू शकता. आबाल-वृद्ध सगळ्यांच्याच हाती मोबाईल असल्यामुळे तुमच्या व्यवसायाची माहिती कमी काळात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचू शकते. त्यासाठी दोन महत्त्वाच्या गोष्टी हवा, तुम्ही ज्या विषयावर काम करणार आहात त्याची गुणवत्ता आणि दुसरा म्हणजे आत्मविश्वास! या दोन गोष्टी असतील तर पुढे दिलेली व्यवसायाची दालनं तुमच्यासाठी खुली होतील हे नक्की!
ऑनलाईन क्लास : जर तुमच्याकडे डान्स, योगा, गाणं असे काही स्किल्स असतील तर तुम्ही घरातली कामं उरकून ऑनलाईन क्लास घेऊ शकता. ऑनलाईन क्लास मुळे जागेचा प्रश्न येणार नाही आणि तुम्हाला फक्त तुमच्या एरियापुरते मर्यादित न राहता जगभरातून विद्यार्थी मिळू शकतील.
युट्युबर बना : जर तुमच्याकडे काही शिकवण्याची कला आहे किंवा सादरीकरणाची कला आहे, काही नाविन्यपूर्ण गोष्टी तुम्हाला सुचतात, भटकंती आवडते तर तुम्ही युट्युबर बनू शकता. मात्र तुमचा कंटेंट चांगला असेल तरच चांगला प्रतिसाद मिळेल आणि त्यातून कालांतराने उत्पन्न देखील मिळेल.
बेकिंग : कोरोना काळात अनेक गृहिणी केक शिकून बनवू लागल्या, विकू लागल्या. बिस्कीट, नानकटाई हे रोज लागणारे पदार्थ तुम्हीदेखील शिकून बनवू शकता आणि त्यातून हळू हळू करत बिझनेस वाढवू शकता.
DIY : कलाकुसरीची आवड असेल तर घरच्या घरी वस्तू बनवून तुम्ही आपल्या सोसायटीत, विभागात तसेच ऑनलाईन विकू शकता. मोबदला मिळेल, मन रमेल आणि नवनवीन गोष्टी करण्यासाठी प्रोत्साहन मिळेल.
शेअर मार्केट : शेअर मार्केटचे शिक्षण घेतले असेल किंवा घेता येणार असेल तर हे घरबसल्या उत्पन्नाचे चांगले साधन होऊ शकते. अनेक गुजराती, मारवाडी बायका दुपारच्या वेळेत शेअर मार्केटचे काम करतात. मात्र या व्यवसायात शिक्षण न घेता उतरू नका, नुकसान होईल.
केटरिंग : अगदी रोज नाही, पण शनि-रवी अर्थात विकेंडला अनेकांकडे घरगुती कार्यक्रम असतात, गेट टुगेदर असतात, एवढेच काय तर आठवडाभर राबून झाल्यावर त्या दोन दिवसात काहीही न करण्याचा कंटाळा असतो, अशा लोकांना चांगला घरगुती नाश्ता देण्यास सुरूवात केली तरी छोटेखानी बिझनेसची सुरुवात होऊ शकेल. तो पुढे कुठवर न्यायचा हे तुमच्या हाती आहे.
होलसेल माल घेऊन अधिक दरात विकणे : जर तुम्हाला काही सुचत नसेल, नवीन काही करता येत नसेल तर चक्क होलसेल माल आणून अधिक दरात विकून तुम्हाला नफा कमवता येईल. अर्थात त्यासाठी बाजार भाव, होलसेल मार्केट फिरावं लागेल, त्यात गुंतवणूक करावी लागेल, जाहिरात करावी लागेल, त्यानंतर माल विकला जाईल. यात कष्ट आहेत पण आयता बिझनेस पुढे नेता येईल.
ट्युशन, क्लास : तुम्ही अभ्यासात चांगले असाल, शिकवण्याचे तंत्र जमत असेल तर घरबसल्या ट्युशन घेऊ शकता. बाहेर सुरु असलेल्या क्लासची फी अनेकांना परवडत नाही, त्यामुळे ट्युशन घेणाऱ्यांना चांगला प्रतिसाद मिळतो.
सुट्टीचे वर्ग : मुलांना शाळेला मोठी सुट्टी असेल तेव्हा किंवा शनी-रवी या दिवसांत आर्ट, क्राफ्ट, पेंटिंग, डान्स, वर्कशॉप घेता येतील. हल्ली हॉबी क्लासेस चांगले चालतात. फक्त योग्य जाहिरात, योग्य मेहनत आणि योग्य तंत्र हाताळता आले पाहिजे.
डबा सुरु करा : आपल्या आजूबाजूला अनेक वर्किंग वुमन, स्पर्धा परीक्षांचे विद्यार्थी, पेइंग गेस्ट राहतात, ज्यांना घरगुती डबा हवा असतो. तुमच्या हाताला चव असेल तर घरबसल्या टिफिन सर्व्हिस सुरु करू शकता. मोजके डबे लावले तरी तुमचा हातखर्च सहज भागू शकेल. त्या बरोबरीने चिवडा, लाडू, पापड, लोणची यांचीही विक्री करू शकता.
ब्युटिशन : हा कोर्स केला असेल तर - नेल आर्ट, मेंदी, साडी ड्रेपिंग, पार्टी मेक अप अशा छोट्या ऑर्डरने सुरुवात करता येईल, हळू हळू तुमची ओळख वाढून जास्त काम मिळू शकेल. हे काम हंगामी असल्याने पूर्ण वेळ त्यात अडकून राहण्याची गरज लागणार नाही.
फोटोग्राफी : जर तुमच्याकडे फोटोग्राफी सेन्स चांगला असेल तर छोट्या समारंभाची ऑर्डर घ्या, त्याची जाहिरात सोशल मीडियावर करा. काढलेले फोटो शेअर करा. गरज पडल्यास चांगले कोर्स करा, नवीन तंत्र शिकून घ्या.
मेहेंदी आर्टिस्ट: बाजारात कितीही टॅटू आले तरी मेहेंदीची क्रेझ कमी झालेली नाही. सध्या छोट्या समारंभापासून लग्न समारंभापर्यंत मेहेंदी काढण्याचे दहा हजार ते लाख भर रुपये आकारले जातात आणि लोक देतात.
इंटेरिअर : घर सजावट करण्यात गृहिणींचा हातखंडा असतो. मात्र तुमचा कोर्स झाला असेल किंवा तुम्हाला इंटेरिअर करण्याची चांगली दृष्टी असेल तर होम स्टायलिंगचे छोटे प्रोजेक्ट घेता येतील. त्यात ऑफिस, बुटीक, घर अशा कोणत्याही जागांचे सजावट करता येईल.
पाळणाघर : पूर्वीपासून हा व्यवसाय बायका करत आहेत. तुम्हालाही मुलांची आवड असेल तर पाळणाघर सुरु करा. त्यात तासाला, दिवसाला, महिन्याला पैसे मिळतात. मात्र ते जबाबदारीचे काम असते तसेच ते आनंददायी देखील ठरू शकते.
गार्डनिंग : चांगलं बागकाम येत असेल तर तुम्ही पैसे घेऊन लोकांची बाग फुलवू शकता. त्यासाठी थोडी मेहनत, माहिती आणि अभ्यास महत्त्वाचा आहे. त्याची तयारी असेल तर हा हाय प्रोफाइल जॉब तुम्ही तुमच्या सवडीने करू शकता आणि चांगले उत्पन्न मिळवू शकता.
क्राफ्टिंग : तुमचे आर्ट क्राफ्ट चांगले असेल तर मुलांच्या शाळेचे प्रोजेक्ट ऑर्डर घेऊन बनवून देऊ शकता. मुलांच्या वह्यांना कव्हर घालण्यापासून प्रोजेक्ट बनवण्यापर्यंत अनेक कामं मिळू शकतात. कारण लोकांना गरज आहे आणि तुमच्याकडे स्किल!
बुटीक : साडीला फॉल, पिको, ड्रेसला अल्टरेशन करायला लोक मिळत नाहीत. ती गरज ओळखून आणि आपल्या एरिया मध्ये या कामाची गरज ओळखून तुम्ही हा बिझनेस सुरु करू शकता.
या सगळ्या टिप्स वाचताना तुम्हाला आणखीही कल्पना सुचल्या असतील हे नक्की! एक लक्षात ठेवा, बिझनेस वाढायला वेळ लागतो, लगेच यश मिळत नाही. अभ्यास करा, कष्ट घ्या आणि सातत्य ठेवा, तुम्ही चांगला व्यवसाय करू शकाल. त्यासाठी सोशल मीडियाचा सदुपयोग करा. काम करा, कमवा, आर्थिक दृष्ट्या स्वावलंबी व्हा!. काम नोकरीत करा नाहीतर व्यवसायात करा, पण काम करत राहा.