अयोध्या - एकीकडे अयोध्येत मंदिरात प्रभू रामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाली तर दुसरीकडे गेल्या २ वर्षापासून सोनी ग्रुप आणि झी एन्टरटेन्मेंटमधील १० अब्ज डॉलरची डील सुरू होण्यापूर्वीच संपली आहे. झी एन्टरटेन्मेंटचे सीईओ पुनित गोयंका हे राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात सहभागी झाले होते. अशावेळी ही बातमी त्यांना मिळाली. त्यानंतर अयोध्येतूनच एक्स प्लॅटफॉर्मवर पोस्ट करत उद्योगपतीने ही माहिती शेअर करत हा प्रभूकडून मिळालेला एक संकेत आहे असं त्यांनी म्हटलं.
रिपोर्टनुसार, सोमवारी २२ जानेवारी २०२४ रोजी सकाळी जपानच्या सोनी ग्रुपने Zee सोबतचा १० अब्ज डॉलरची मर्जर डील संपुष्टात आणण्याची घोषणा केली. अधिकृतपणे त्यांनी झी एन्टरटेन्मेंटला टर्मिनेशन लेटर पाठवले. झीकडून बाजार नियामकाला याची माहिती शेअर करण्यात आली. अयोध्येतील राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला पोहोचलेले Zee चे एमडी पुनित गोयंका यांनी आपल्या एक्स पोस्टच्या माध्यमातून हा मोठा करार रद्द झाल्याची बातमी दिली. त्यांनी लिहिलं की, प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या शुभदिवशी मी सकाळी सकाळी अयोध्येला पोहचलो. तेव्हा मला एक मेसेज मिळाला. ज्या डीलचं स्वप्न पूर्ण करायला आणि काम करण्यासाठी मी २ वर्ष प्रयत्न केले. ते अयशस्वी ठरले असं त्यांनी सांगितले.
गोयंकांनी पुढे म्हटलं की, मी हा करार यशस्वी बनवण्यासाठी सर्वोत्तम आणि प्रामाणिक प्रयत्न केले. परंतु त्यानंतरही हे यशस्वी होऊ शकले नाही. कदाचित प्रभू रामांकडून मला हा एक संकेत मिळाला असं वाटते. मी सकारात्मक दृष्टीने पुढे जाण्याची आणि भारतातील अग्रणी M&E कंपनीच्या सर्व भागीदारांच्या हिताला मजबूत करण्याच्या दिशेने काम करण्याचा संकल्प करतो. जय श्री राम...असं त्यांनी विश्वास व्यक्त केला. झी आणि सोनी दरम्यानच्या या विलीनीकरणाची घोषणा २०२१ मध्ये करण्यात आली होती. विलीन झालेल्या कंपनीची किंमत १० अब्ज डॉलर्स झाली असती परंतु प्रक्रियेत अनेक गुंतागुंत होत्या आणि आता हा करार रद्द करण्यात आला आहे. ब्लूमबर्गनं दिलेल्या वृत्तानुसार जपानी एन्टरटेन्मेंट कंपनी सोनीनं सोमवारी सकाळी झी एंटरटेनमेंटला टर्मिनेशन लेटर पाठवलं आहे.
As I arrived at Ayodhya early this morning for the auspicious occasion of Pran Pratishtha, I received a message that the deal that I have spent 2 years envisioning and working towards had fallen through, despite my best and most honest efforts.
— Punit Goenka (@punitgoenka) January 22, 2024
I believe this to be a sign from… pic.twitter.com/gASsM4NdKq
दरम्यान, सोनीकडून विलीनीकरणाचा करार रद्द झाल्यानंतर आता झीने कायदेशीर कारवाई करण्याचे संकेत दिलेत. सोनी कॉर्पकडून सांगितले जात आहे की, आम्ही झी एन्टरटेन्मेंटकडून ९० मिलियन डॉलर अथवा जवळपास ७४८ कोटीहून अधिक टर्मिनेशन शुल्काची मागणी केली आहे. कारण कंपनीने कराराच्या नियमांचे उल्लंघन केले. तर दुसरीकडे सोनीकडून केलेला दावा झी एन्टरटेन्मेंटने फेटाळला आहे. आम्ही कराराचे कुठलेही उल्लंघन केले नाही असं झी चं म्हणणं आहे.