Join us

जुलै महिन्यात झाली देशाच्या निर्यातीमध्ये लक्षणीय सुधारणा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 05, 2020 1:38 AM

पीयूष गोयल : अर्थव्यवस्था पूर्वपदावर येण्याची चिन्हे

नवी दिल्ली : देशाची अर्थव्यवस्था पुन्हा पूर्वपदावर येण्याची चिन्हे दिसू लागली असून, जुलै महिन्यात देशाच्या निर्यातीमध्ये लक्षणीय सुधारणा झाल्याचे केंद्रीय वाणिज्य व उद्योगमंत्री पीयूष गोयल यांनी स्पष्ट केले आहे. मागील वर्षाच्या जुलै महिन्यात झालेल्या निर्यातीच्या जवळपास देशाची निर्यात पोहोचल्याची माहितीही त्यांनी दिली.

पत्रकारांशी बोलताना गोयल म्हणाले की, गेल्या ४ महिन्यांत कोरोनाच्या संकटामुळे अर्थव्यवस्था ठप्प झाल्यासारखी होती. हळूहळू आर्थिक व्यवहार सुरळीत होत असून, त्याचे प्रतिबिंब जुलै महिन्यातील निर्यातीची आकडेवारी बघता दिसत आहे. जुलै २०१९ मध्ये देशाने जेवढी निर्यात केली होती त्याच्या जवळपास ९५ टक्के निर्यात या वर्षामध्ये झाली आहे. मार्च महिन्याच्या अखेरीस देशव्यापी लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर गेले ३ महिने देशाची निर्यात कमी होत होती. जुलै महिन्यामध्ये मात्र त्यामध्ये वाढ झाली आहे. जुलै महिन्यात निश्चित स्वरूपात किती निर्यात झाली, त्याचप्रमाणे किती आयात झाली, याची संपूर्ण आकडेवारी अद्याप उपलब्ध झाली नसली तरी प्रारंभिक माहितीनुसार निर्यातीमध्ये चांगली वाढ झाल्याचे गोयल यांनी स्पष्ट केले.जून महिन्यात सलग चौथ्यांदा देशातील निर्यात कमी झाली आहे. त्याचप्रमाणे आपली आयातही ४७.५९ टक्के अशी विक्रमी कमी झाल्याने १८ वर्षांत प्रथमच देशाच्या आयात-निर्यात व्यापारातील तफावत ही अधिकच्या बाजूला आली आहे. एप्रिल महिन्यात निर्यातीत ६०.२८ टक्के तर मे महिन्यात ३७.७ टक्के अशी कपात झाल्याचेही गोयल यांनी सांगितले.देश स्वयंपूर्ण करण्याकडे लक्षकोरोनाच्या संकटानंतर देशाचे उद्योगक्षेत्र केवळ अर्थव्यवस्थेची गाडी रुळावर आणण्यासाठीच प्रयत्न करीत नसून देश स्वयंपूर्ण कसा बनेल याकडे विशेषत्वाने लक्ष दिले जात असल्याचे गोयल यांनी स्पष्ट केले. देशातील उद्योगक्षेत्राचा मूड स्वयंपूर्णतेकडे असून, त्यासाठी आपल्या उत्पादनांची गुणवत्ता वाढविण्याचा प्रयत्न केला जात आहे. याशिवाय आपल्या उत्पादनांच्या किमती प्रतिस्पर्ध्यांपेक्षा कमी कशा राहतील, याचाही विचार केला जात आहे. देशातील उत्पादनाला मागणी वाढत असली तरी आंतरराष्ट्रीय क्षेत्रामध्ये आपल्याला मोठ्या स्पर्धेला तोंड द्यावे लागत असल्याचे गोयल यांनी सांगितले.

टॅग्स :व्यवसायपीयुष गोयल