नवी दिल्ली : कोविड-१९ महामारीच्या पार्श्वभूमीवर लावण्यात आलेले लॉकडाऊन शिथिल करण्यात आल्यानंतर विविध क्षेत्रांत लक्षणीय सुधारणा दिसून येत आहे. ही स्थिती अर्थव्यवस्थेला पोषक असून, आधी अनुमानित केल्याप्रमाणे वित्त वर्ष २०२१ मध्ये सकल राष्ट्रीय उत्पन्नात (जीडीपी) फार मोठी घसरण होणार नाही. घसरण राहील; पण ती फारच थोडी असेल, असे जाणकारांना वाटते. ऊर्जा क्षेत्रात मागणी मोठ्या प्रमाणात वाढल्याचे दिसून आले आहे. ‘राष्ट्रीय भार प्रेषण’च्या आकडेवारीनुसार, ६ ऑक्टोबरला संपलेल्या आठवड्यात वीज वापर आदल्या वर्षाच्या तुलनेत १४ टक्क्यांनी वाढून ३.७ अब्ज युनिटवर गेला. शिखरकालीन मागणी १३.५ टक्क्यांनी वाढून १६५,५०१ मेगावॉट झाली.सरासरी दैनंदिन मालमत्तांची महाराष्ट्रात होणारी नोंदणी सप्टेंबरमध्ये वाढून ३,९३६ वर गेली. मे २०१९ नंतरची ही सर्वोच्च नोंदणी ठरली. सप्टेंबरमध्ये पेट्रोलचा वापर २ टक्क्यांनी वाढला. डिझेलचा वापर मात्र ५.५ टक्क्यांनी घसरला. सप्टेंबरमध्ये रिटेल पेमेंटमध्ये चांगली वाढ झाल्याचे दिसून आले आहे. यूपीआय आणि आयएमपीएस व्यवहार उच्चांकावर राहिले. मागील तीन महिन्यांतील यूपीआय व्यवहार ३.२९ लाख कोटी राहिले. त्यापूर्वीच्या १२ महिन्यांत ते १.९६ लाख कोटीच होते.सप्टेंबरच्या पहिल्या पंधरवड्यात रेल्वे मालवाहतूक १५ टक्क्यांनी वाढली. वस्तू उत्पादन पीएमआय ५६.८ अंकांवर गेला. हा ८ वर्षांचा उच्चांक आहे. सप्टेंबरमधील निर्यात वार्षिक आधारावर ५.२७ टक्क्यांनी वाढून २७.४ अब्ज डॉलर झाली. २५ सप्टेंबरला संपलेल्या आठवड्यात सरासरी हवाई प्रवासी संख्या १.३९ लाख झाली. २९ मेच्या आठवड्यात ती फक्त ३८ हजार होती. जीएसटी संकलन सप्टेंबरमध्ये ४ टक्क्यांनी वाढून ९५,४८० कोटींवर गेले. त्याचप्रमाणे आता देशाच्या अनेक भागांमधून लॉकडाऊन उठविले गेले असल्याने अर्थव्यवस्था गतीमान होत आहे.सप्टेंबरमध्ये ई-वे बिलांत ९.६ टक्क्यांची वाढ होऊन बिलांची संख्या ५७.४ दशलक्षांवर गेली. हा मागील दोन वर्षांतील उच्चांक ठरला. पहिल्या सहा महिन्यांत राज्यांतर्गत ई-वे बिले १५ टक्क्यांनी, तर आंतरराज्य ई-वे बिले २.२ टक्क्यांनी वाढली. राष्ट्रीय ई-टोल संकलन फेब्रुवारी ते सप्टेंबर या काळात ५.४ टक्क्यांनी वाढून १,९४१ कोटींवर गेले. सप्टेंबरमधील ई-टोल संकलन ११0.0८ दशलक्ष राहिले.
अर्थव्यवस्थेत लक्षणीय सुधारणा; जीडीपीमध्ये होणारी घसरण होऊ शकते कमी
By ऑनलाइन लोकमत | Published: October 09, 2020 12:54 AM