Lokmat Money > बिझनेस न्यूज > अनुकूल वातावरणामुळे निर्देशांकांची उच्चांकी झेप

अनुकूल वातावरणामुळे निर्देशांकांची उच्चांकी झेप

शेअर बाजाराचे निर्देशांक वाढीव पातळीवर बंद झाले. सलग पाचव्या महिन्यात निर्देशांक वाढला.

By admin | Published: August 1, 2016 04:10 AM2016-08-01T04:10:06+5:302016-08-01T04:10:06+5:30

शेअर बाजाराचे निर्देशांक वाढीव पातळीवर बंद झाले. सलग पाचव्या महिन्यात निर्देशांक वाढला.

A significant rise in the index due to favorable environment | अनुकूल वातावरणामुळे निर्देशांकांची उच्चांकी झेप

अनुकूल वातावरणामुळे निर्देशांकांची उच्चांकी झेप


जगभरातील शेअर बाजारांमध्ये असलेले अनुकूल वातावरण, फ्युचर आणि डेरिव्हेटीव्हज्मधील सकारात्मक वातावरण, अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या जीएसटी विधेयकाबाबत होत असलेल्या हालचाली, अमेरिका आणि जपानने कायम राखलेले व्याजदर आणि परकीय वित्तसंस्थांची जोरदार खरेदी, यामुळे शेअर बाजाराचे निर्देशांक वाढीव पातळीवर बंद झाले. सलग पाचव्या महिन्यात निर्देशांक वाढला.
गतसप्ताहात मुंबई शेअर बाजारामध्ये पाच दिवस व्यवहार झाले. यापैकी तीन दिवस निर्देशांकात वाढ झाली, तर दोन दिवस घसरण. असे असले, तरी बाजारातील वातावरण सकारात्मक असलेले दिसून आले. मुंबई, तसेच राष्ट्रीय शेअर बाजारामध्ये झालेल्या व्यवहारांच्या संख्येत आणि रकमेतही आधीच्या सप्ताहापेक्षा वाढ झालेली दिसून आली. शेअर बाजाराचा संवेदनशील निर्देशांक सप्ताहभरात २४८.६२ अंश म्हणजेच, ०.८९ टक्क्यांनी वाढून २८०५१.८६ अंशांवर बंद झाला. या निर्देशांकाने ११ महिन्यांतील उच्चांकी धडक मारली आहे. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक (निफ्टी) १.१४ टक्के म्हणजे ९७.३० अंशांनी वाढून ८६३८.५० अंशांवर बंद झाला.
या निर्देशांकानेही १५ महिन्यांतील उच्चांकी पातळी गाठली आहे. मिडकॅप आणि स्मॉलकॅप या बाजाराच्या क्षेत्रीय निर्देशांकांमध्येही वाढ झाली असून, ते अनुक्रमे १२६६१.०६ आणि १२३०९.९५ अंशांवर बंद झाले आहेत. या दोन्ही निर्देशांकांची वाढ संवेदनशील निर्देशांकापेक्षा अधिक आहे, हे विशेष.
अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेले वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) विधेयक पुढील सप्ताहात राज्यसभेमध्ये मांडले जाणार आहे. याबाबतची घोषणा सप्ताहाच्या अखेरीस झाल्याने, हे विधेयक मंजूर होण्याची शक्यता वाढीस लागल्याने बाजारावर त्याचा चांगला परिणाम दिसून आला. फ्युचर्स अँड डेरिव्हेटिव्हज्च्या कॉन्ट्रॅक्टमध्येही तेजीचे वातावरण दिसून येत असल्याचा बाजाराला लाभ झाला.
>आठवड्यातील घडामोडी
जीएसटी विधेयक मंजूर होण्याची शक्यता वाढीस लागल्याने बाजारामध्ये तेजी
सलग पाचव्या महिन्यामध्ये निर्देशांक वाढीव पातळीवर बंद
मिडकॅप आणि स्मॉलकॅप या क्षेत्रीय निर्देशांकांमध्ये अनुक्रमे ३.१३ आणि १.६७ टक्क्यांनी वाढ
परकीय वित्तसंस्थांची बाजारातील खरेदी कायम
अमेरिका, जपानने ठेवले व्याजदर जैसै थे
फ्युचर्स अँड डेरिव्हेटिव्हज्च्या कॉन्ट्रॅक्टमध्येही तेजीचे वातावरण दिसून येत असल्याचा बाजाराला लाभ झाला.
गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने खरेदी करीत असलेल्या परकीय वित्तसंस्था, संस्थागत गुंतवणूकदारांनी गतसप्ताहातही चांगली खरेदी केली. सप्ताहभरात त्यांनी ३९९३.६० कोटी रुपये बाजारात ओतले.
उत्साही वातावरण
जगभरातील शेअर बाजारंमध्येही गतसप्ताहामध्ये चांगले वातावरण दिसून आले. अमेरिका, तसेच जपानने आपले व्याजदर सध्याच्याच पातळीवर कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, भारतासह जगातील २० प्रमुख अर्थव्यवस्थांनी जागतिक अर्थव्यवस्थेच्या वाढीसाठी नियोजनबद्ध उपाय योजण्याची केलेली घोषणाही वातावरण चांगले बनविण्यास उपयुक्त ठरली.

Web Title: A significant rise in the index due to favorable environment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.