लाेकमत न्यूज नेटवर्क
बंगळुरू : लसीकरणाचे वाढते प्रमाण आणि दैनंदिन रुग्णसंख्येतील घट यामुळे कोविड-१९ साथीचा धोका कमी झाल्याच्या पार्श्वभूमीवर माहिती तंत्रज्ञान (आयटी) क्षेत्रातील कंपन्यांकडून ‘वर्क फ्रॉम होम’ला तीलांजली देण्याचा विचार सुरू असल्याचे संकेत मिळत आहेत. देशातील आघाडीची आयटी कंपनी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसने (टीसीएस) २०२१ च्या अखेरपर्यंत आपल्या ७० ते ८० टक्के कर्मचाऱ्यांना कार्यालयात बोलावण्याचे नियोजन चालविले आहे.
टीसीएसचे सीईओ राजेश गोपीनाथन यांनी पत्रकारांना सांगितले की, चालू कॅलेंडर वर्षाच्या अखेरपर्यंत अथवा पुढील वर्षाच्या सुरुवातीला ७० ते ८० टक्के कर्मचाऱ्यांना कार्यालयातून काम करण्यास बोलावून घेण्याचे नियोजन आम्ही करीत आहोत.
आयटी क्षेत्रातील तज्ज्ञांनी सांगितले की, कोविड-१९ साथीमुळे मागील सुमारे २ वर्षांपासून आयटी कंपन्यांचे कामकाज विस्कळीत झाले आहे. सर्वच कंपन्यांनी वर्क फ्रॉम होमची सुविधा कर्मचाऱ्यांना दिली आहे. टीसीएसने कर्मचारी पुन्हा कार्यालयात बोलावल्यास हा कल आयटी कंपन्यांत तत्काळ व्हायरल होईल.
टीसीएसमध्ये पाच लाखांपेक्षा जास्त लोक काम करतात.आयटी क्षेत्रातील ४.६ दशलक्ष श्रमशक्तीत टीसीएसचा वाटा १० टक्के आहे. तसेच भारताच्या १५० अब्ज डॉलरच्या सॉफ्टवेअर निर्यात व्यवसायात कंपनीचा वाटा १५ टक्के आहे. ऑगस्टमध्ये कंपनीचे बाजार भांडवल १३ लाख कोटी रुपयांवर पोहोचले.