रशियाने युक्रेनवर हल्ला केला त्याला आज १०० दिवस पूर्ण झाले. याचबरोबर जगावर मंदीचे ढग दाटू लागल्याचे संकेत दिसू लागले आहेत. जगातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती एलन मस्क यांची प्रसिद्ध इलेक्ट्रीक कार कंपनी टेस्लामध्ये मोठ्या प्रमाणावर कर्मचारी कपातीचे संकेत दिले आहेत. काही दिवसांपूर्वीच मस्क यांनी मंदीची शंका व्यक्त केली होती.
टेस्लाचे सीईओ मस्क यांनी आपल्या काही अधिकाऱ्यांना मेल पाठवला आहे. यामध्ये अर्थव्यवस्थेवरून आपल्याला Super Bad Feeling येत आहेत, असे त्यांनी म्हटले आहे. यासाठी आपल्याला कंपनीतून १० टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकावे लागेल, असेही त्यांनी म्हटले आहे.
जगभरात टेस्लाने नवीन कर्मचारी भरतीवर बंदी आणावी. मला अर्थव्यवस्थेवरून खूप वाईट भावना येत असल्याचे मस्क यांनी म्हटले आहे. त्यापूर्वी मस्क यांनी मंगळवारी पाठविलेल्या मेलमध्ये घरून किंवा वेगवेगळ्या सेंटरमधून हेडऑफिसचे काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना मूळ ठिकाणी कामावर यावे अन्यथा टेस्ला सोडून जावे, असा कठोर शब्दांत इशारा दिला होता. तसेच प्रत्येक कर्मचाऱ्याने आठवड्याला कमीतकमी ४० तास काम करावे, असेही आदेश दिले होते.
शेअर मार्केटला दिलेल्या माहितीनुसार २०२१ च्या अखेरीपर्यंत टेस्लामद्ये एक लाख कर्मचारी होते. यावर टेस्लाकडून कोणताही प्रतिक्रिया आलेली नाही. रॉयटर्सने सुत्रांच्या हवाल्याने ही माहिती दिली आहे.
दुसरीकडे भारतात देखील काही टेक आणि स्टार्टअप कंपन्यांनी आपला कर्मचारी वर्ग कमी केला आहे. Cars24 ने ६०० कर्मचाऱ्यांची कपात केली आहे. Unacademy ने देखील ६०० कर्मचाऱ्यांना कमी केले आहे. Lido Learning ने कामच बंद केले आहे. कर्मचाऱ्यांना कित्येक महिन्यांपासून पगार दिला नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. Meesho, Furlenco आणि ट्रेलसारख्या कंपन्यांनीही कर्मचारी कपात सुरु केली आहे. Netflix ने देखील 150 कर्मचारी आणि डझनभर कंत्राटदारांना कमी केले आहे.