जळगाव : अर्थसंकल्प सादर झाल्यापासून सराफ बाजारात सुरू असलेली घसरण तिसऱ्या दिवशीही कायम राहत बुधवार, ३ फेब्रुवारी रोजी चांदी तीन हजार रुपयांनी घसरुन ७० हजार रुपयांवर आली. तसेच सोन्याच्याही भावात ६०० रुपयांनी घसरण होऊन ते ४८ हजार ९०० रुपयांवर आले.
केंद्रीय अर्थसंकल्पात सोने-चांदीवरील आयात शुल्कात कपात करण्यात आल्याने त्याचे भाव कमी-कमी होत असल्याचे तीन दिवसांपासून चित्र आहे. पहिल्या दिवशी एक हजार रुपयांनी घसरण झालेल्या चांदीच्या भावात मंगळवार, २ रोजी एक हजार ५०० रुपयांनी घसरण झाली. त्यानंतर बुधवार, ३ रोजी ही घसरण आणखी वाढून थेट तीन हजार रुपयांनी चांदीचे भाव कमी झाले व ती थेट ७० हजार रुपये प्रति किलोवर आली. अशाच प्रकारे सोन्याच्या भावात पहिल्या दिवशी ५०० रुपयांनी व दुसऱ्या दिवशी मंगळवारी ४०० रुपयांनी घसरण झाली होती. त्यानंतर बुधवार, ३ रोजी पुन्हा ६०० रुपयांनी घसरण होऊन सोने थेट ४८ हजार ९०० रुपये प्रति तोळ्यावर आले. अर्थसंकल्पाच्या दिवशी दरातील चढउतार कायम होते.
स्थानिक कंपन्यांना वाव मिळण्याची शक्यता
अर्थसंकल्पात पायाभूत सुविधांसाठी केलेल्या तरतुदींमुळे तसेच बहुतांश घटकांवर आयात शुल्काचा भार वाढल्याने स्थानिक कंपन्यांना वाव मिळणार असल्याच्या शक्यतेने शेअर बाजारात उसळी सुरू असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. त्यामुळे सराफ बाजारात घसरण सुरू असल्याचेही सांगितले जात आहे.