जळगाव :
गेल्या १० दिवसांपासून भाववाढ होत असलेल्या चांदीच्या भावात शुक्रवार, २३ सप्टेंबर रोजी एकाच दिवसात एक हजार २०० रुपयांनी पुन्हा वाढ झाली. त्यामुळे चांदीचे भाव ५८ हजार ७०० रुपये प्रति किलोवर पोहचली आहे. या सोबतच घसरण होत गेलेल्या सोन्याच्या भावात शुक्रवारी ६०० रुपयांची वाढ होऊन ते ५१ हजार १०० रुपये प्रति तोळ्यावर पोहचले आहे.
सप्टेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून चांदीच्या भावात वाढ सुरू झाली. यात १३ सप्टेंबर रोजी चांदीत एक हजारांची वाढ होऊन ती ५७ हजार ८०० रुपयांवर पोहचली होती. त्यानंतर १४ रोजी घसरण झाली मात्र त्यानंतर पुन्हा भाववाढ होत राहिली. यात शुक्रवार, २३ सप्टेंबर रोजी तर थेट एक हजार २०० रुपयांची वाढ झाली व चांदी ५८ हजार ७०० रुपये प्रति किलोवर पोहचली.
दुसरीकडे सोन्याच्याही भावात वाढ होत आहे. तसे पाहता गेल्या १० दिवसांपासून सोन्याचे भाव कमी होत होते. मात्र शुक्रवारी त्यात ६०० रुपयांची वाढ झाली. त्यामुळे सोने ५० हजार ५०० रुपयांवरून ५१ हजार १०० रुपये प्रति तोळ्यावर पोहचले. आंतरराष्ट्रीय पातळीवर सोने-चांदीला मागणी वाढत असल्याने ही भाववाढ झाल्याचे सांगण्यात येत आहे.
गेल्या काही दिवसांपासून सोन्याचे भाव कमी होत होते तर चांदीत वाढ सुरूच होती. आता तर चांदीसह सोन्याच्या भावात काहीसी वाढ झाली आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर मागणी वाढल्याने ही भाववाढ होत आहे.
- भागवत भंगाळे, सुवर्ण व्यावसायिक.