जळगाव : गेल्या सात महिन्यांपासून कोरोनामुळे परिणाम झालेली बाजारपेठ हळूहळू पूर्वपदावर येऊ लागल्याने सोन्या-चांदीला मागणी वाढून त्यांचे भावही वाढू लागले आहे. त्यामुळेच सोमवार, १२ आॅक्टोबर रोजी चांदीच्या भावात तीन हजार ५०० रुपयांनी वाढ होऊन ती ६४ हजार ५०० रुपयांवर पोहोचली. तसेच सोन्याच्याही भावात ८०० रुपयांनी वाढ होऊन ते ५१ हजार ६०० रुपये पोहोचले.
कोरोनाचा संसर्ग वाढू लागल्याने मार्च महिन्यापासून सर्वच घटकांवर परिणाम झाला. त्यामुळे बाजारपेठा बंद असल्याने सुवर्ण बाजारावरही त्याचा परिणाम झाला. तसेच जागतिक पातळीवर उलाढाल थांबून व सट्टेबाजारात गुंतवणूक वाढू लागल्याने सुवर्ण बाजार अस्थिर झाला. हळूहळू अनलॉक होत असताना ग्राहकी वाढू लागली. त्यात आता कोरोना रुग्ण कमी होऊन बाजारपेठेतही खरेदी वाढू लागली आहे. गेल्या महिन्यात सातत्याने कमी होत गेलेल्या सोन्या-चांदीला आता मागणी वाढू लागल्याने त्यांच्या भावात वाढ होत आहे.
सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून चांदीचे भाव वाढत आहे. यामध्ये २९ सप्टेंबर रोजी चांदीच्या भावात एक हजार ८०० रुपयांची वाढ झाली होती. त्यानंतर ३० रोजी पुन्हा एक हजार रुपयांनी वाढ होऊन चांदी ६२ हजार रुपये प्रतिकिलोवर पोहोचली. त्यानंतर ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीपासून थोडाफार चढ-उतार होऊन सोमवार, १२ आॅक्टोबर रोजी चांदीच्या भावात तीन हजार ५०० रुपयांनी वाढ होऊन ती थेट ६४ हजार ५०० रुपये प्रतिकिलोवर पोहोचली. अशाच प्रकारे सोन्याच्याही भावात सोमवारी ८०० रुपयांनी वाढून ते ५१ हजार ६०० रुपये प्रतितोळ्यावर पोहोचले.अधिकमासामुळे मागणी वाढलीसध्या अधिकमासामुळे राज्यात सोन्या-चांदीला चांगलीच मागणी वाढली आहे. यात सुवर्णनगरी जळगावातील सोने-चांदी खरेदीला अधिकच प्रतिसाद मिळत आहे. माहेरी आलेल्या लेकी-जावयासाठी चांदीच्या वस्तूंसह सोन्याचीही खरेदी होत असल्याने मागणी चांगलीच वाढल्याचे सुखद चित्र आहे. अधिकमासाला आपल्याकडेच महत्त्व असले तरी जागतिक पातळीवरही थांबलेला सुवर्ण बाजार हळूहळू पूर्वपदावर येत असल्याने मागणी वाढत असल्याचेही सांगितले जात आहे.