नवी दिल्ली - सर्वसामान्यपणे सोने हा गुंतवणुकीसाठी उत्तम पर्याय मानला जातो. तर थोडी जोखीम पत्करून अधिक रिटर्न मिळवण्यासाठी लोक म्युच्युअल फंडामध्येही गुंतवणूक करतात. मात्र सोने आणि म्युच्यअल फंडापेक्षा चांदीमधीलगुंतवणूक अधिक पटीने रिटर्न मिळवून देऊ शकते हे तुम्हाला माहिती आहे का? जर आज तुम्ही चांदीमध्ये गुंतवणूक केली तर येणार्या काळात ती तुम्हाला मालामाल करू शकते.
भारतासह जगभरामध्ये येत्या काही काळात व्याजदर वाढण्याची शक्यता आहे. इक्विटीमध्येही कधीही घसरण होऊ शकते. बाजारातील विश्लेषकांच्या मते यावर्षीच्या तिसऱ्या तिमाहीपर्यंत कोरोनाची साथ संपुष्टात आल्यानंतर ही अनश्चितता कमी होईल. त्यामुळे सोन्यातील गुंतवणूक कमी होऊ शकते. तसेच तेजी पाहून लोक चांदीमध्ये गुंतवणूक करू शकतात.
तज्ज्ञांच्या मते २०२२ आणि पुढच्या काही वर्षांमध्ये चांदीच्या किमतीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होऊ शकते. केडिया अॅडव्हायझरीचे व्यवस्थापकीय संचालक अजय केडिया यांनी सांगितले की, यावर्षी चांदीचा दर ८० हजार रुपयांपर्यंत पोहोचू शकते. तर २०२४ पर्यंत चांदीचा दर दीड लाख रुपये प्रतिकिलोपर्यंत पोहोचू शकतो. सध्या चांदी ६१ हजार रुपये प्रतिकिलो आहे. आधारावर २०२४ पर्यंत चांदीवर २५० टक्के रिटर्न मिळू शकतो.
अजय केडिया यांनी सांगितले की, ज्या प्रमाणात मागणी वाढत आहे, त्या प्रमाणात चांदीच्या खाणकामामध्ये वाढ होत नाही आहे. २०१८-२० पर्यंत चांदीच्या खाणकामामध्ये वाढ झालेली नाही. २०१८-२० पर्यंत चांदीच्या खाणकामामध्ये सातत्याने घट होत आहे. त्यांनी सांगितले की, ऑटोमोबाईल, सोलर आणि इलेक्ट्रिक वाहन उद्योगामधून चांदीची अतिरिक्त मागणी होत आहे. ती वार्षिक आधारावर वाढत आहे. त्याशिवाय अमेरिका ग्रीन टेक्नॉलॉजीला सपोर्ट करत आहे. पर्यावरणपुरक टेक्नॉलॉजीमध्ये चांदीचा वापर अधिक प्रमाणात होत असतो.
लंडनमधील सिल्व्हर इन्स्टिट्युटने दावा केला की, गेल्या पाच वर्षांपासून चांदीची जागतिक मागणी सातत्याने वाढत आहे. मात्र कोरोनामुळे २०२० मध्ये मागणी घटली होती. उलट २०१७ पासून चांदीच्या खाणकामामध्ये सातत्याने घट होत चालली आहे. केवळ २०२१ मध्ये त्यात वाढ नोंदवली गेली होती. आकड्यांनुसार २०२२-२४च्या दरम्यान, चांदीच्या मागणीमध्ये २५ ते ३० टक्के वाढ होणार आहे. त्या उलट खाणकामामध्ये केवळ ८ टक्के वाढीचा अंदाज आहे.