जळगाव : जागतिक पातळीवर दलाल सक्रिय झाल्याने सोन्याच्या भावात सातत्याने चढ-उतार होत असून, गुरुवारी चांदीच्याही भावात एकाच दिवसात दीड हजार रुपये प्रति किलोने घसरण झाली आहे. सोन्याच्या भावात मात्र ३०० रुपये प्रति तोळ्याने वाढ झाली आहे.
गेल्या काही दिवसांपासून अमेरिकन डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपयात घसरण होत असल्याने सोने-चांदीचे भाव वाढतच आहेत. यात भर म्हणजे मुंबई शेअर बाजार तसेच विदेशातील शेअर बाजारात सातत्याने घसरण झाल्याने सोने-चांदीचे भाव वधारू लागले आहेत. त्यात जागतिक पातळीवर दलालही सक्रिय झाल्याने अचानक त्यांनी खरेदी वाढविली व दोन्ही धातूंचे भाव एकदम वाढले. त्यात आता चांदीमध्ये खरेदी कमी केल्याने चांदीत थेट दीड हजार रुपये प्रति किलोने घसरण झाली.
गेले १२ दिवस चांदीमध्ये सातत्याने वाढ झाली. १३ फेब्रुवारी रोजी ४६ हजार रुपये प्रति किलो असलेल्या चांदीचे भाव १५ रोजी ४७ हजार रुपयांवर पोहोचले. १८ रोजी ते ४७ हजार ५००, २० रोजी ४८ हजार रुपये व २१ रोजी ४९ हजार रुपये प्रति किलोवर पोहोचले. त्यानंतर २६ फेब्रुवारीपर्यंत ते ४९ हजार रुपयांवर स्थिर राहिले. मात्र २७ रोजी थेट दीड हजार रुपयांनी घसरण होऊन चांदी ४७ हजार ५०० रुपये प्रति किलोवर आली.
दोन दिवसांपासून सोन्याचे भाव कमी होत गेले. मात्र गुरुवारी त्यात ३०० रुपये प्रति तोळ्याने वाढ होऊन सोने ४३ हजार १०० रुपये प्रति तोळ्यावर पोहोचले आहे.
आणखी दरवाढ शक्य
जागतिक पातळीवर सोने, चांदीची खरेदी-विक्री कमी-अधिक होत असल्याने त्यांच्या भावात चढ-उतार होत आहे. हे भाव आणखी वाढण्याची शक्यता आहे, असे जळगाव शहर सराफ असोसिएशनचे अध्यक्ष अजयकुमार ललवाणी यांनी सांगितले.
दलालांची हातचलाखी
अमेरिका, युरोपिय देशात दलाल सक्रिय झाल्याने सोने-चांदीचे भाव कमी-जास्त होत असल्याचे सांगितले जात आहे. यात आता चांदीचे भाव कमी झाले असले तरी ते आणखी वाढून ५५ हजार रुपये प्रति किलो तर सोने ४५ हजार रुपये प्रति तोळ्यावर पोहचू शकते, असे चित्र दलालांमुळे निर्माण झाल्याचे सांगण्यात येत आहे.