ट्रायच्या आदेशानंतर सर्व टेलिकॉम कंपन्यांनी एक महिन्याची वैधता असलेले काही प्लॅन लाँच केले आहेत. Airtel, Jio, Vi आणि BSNL सर्व दूरसंचार कंपन्यांनी त्यांच्या पोर्टफोलिओमध्ये यापूर्वी असे प्लॅन्स अॅड केले आहेत. हे सर्व प्लॅन एक महिना आणि 30 दिवसांच्या वैधतेसह येतात. ट्रायने सर्व कंपन्यांना असा किमान एक प्लॅन सुरू करण्यास सांगितले होते.
आता ट्रायनं या प्लॅन्सची यादी जारी केली आहे. युझर्सच्या तक्रारींनंतर ट्रायनं टेलिकॉम कंपन्यांना असे रिचार्ज प्लॅन्स जारी करण्याचे आदेश दिले होते. 30 दिवसांचा प्लॅन अॅड झाला असला तरी अनेक प्लॅन्स हे 28 दिवसांचेच आहेत.
एअरटेलचे प्लॅन्स
एअरटेलच्या पोर्टफोलिओमध्ये 128 रुपये आणि 131 रूपयांचे दोन प्लॅन्स आहेत. 128 रुपयांच्या प्लॅनची वैधता 30 दिवसांची आहे. यामध्ये लोकल आणि एसटीडी कॉलसाठी 2.5 पैसे प्रति सेकंदाचा दर आकारला जातो. नॅशनल व्हिडीओ कॉलिंगसाठी 5 पैसे, डेटासाठी 50 पैसे प्रति सेकंद आणि एसएमएस 1 रूपया आणि एसटीडी एसएमएससाठी 1.5 रूपये आकारले जातात. 131 रूपयांच्या प्लॅनमध्ये या सेवा महिन्याच्या वैधतेसह मिळतात.
बीएसएनएल, एमटीएनएल प्लॅन्स
बीएसएनएलचा 30 दिवसांच्या वैधतेसह येणारा प्लॅन 199 रूपयांचा आहे. तर महिन्याच्या वैधतेसह येणारा प्लॅन 229 रूपयांचा आहे. एमटीएनएलचे हे प्लॅन 151 रूपये आणि 97 रूपयांना मिळतात.
जिओचे प्लॅन्स
ट्रायच्या आदेशानंतर जिओनंही आपल्या पोर्टफोलिओमध्ये दोन प्लॅन्स अॅड केले आहेत. एका महिन्याच्या वैधतेचा प्लॅन 259 रूपयांचा आहे. यामध्ये दररोज 1.5 जीबी डेटा, अनलिमिटेड कॉलिंग, 100 एसएमएस आणि जिओ अॅप्सचं सबस्क्रिप्शन मिळतं. तर 30 दिवसांच्या वैधतेचा प्लॅन 296 रूपयांचा आहे. यात ग्राहकांना 25 जीबी डेटा, अनलिमिटेड कॉलिंग, 100 एसएमएस दररोज दिले जातात.
व्होडाफोन आयडियाचे प्लॅन्स
कंपनीचा 30 दिवसांच्या वैधतेचा प्लॅन 137 रूपयांचा आहे. यात ग्राहकांना 10 लोकल नाईट्स, 2.5 पैसे प्रति सेकंद दरानं कॉलिंग, 1 रूपये आणि 1.5 रूपये दरानं लोकल आणि एसटीडी एसएमएस दिले जातात. 141 रूपयांना महिनाभरासाठी हे बेनिफिट्स दिले जातात.